पान:अयोध्येचे नबाब.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ अयोध्येचे नबाब. - [भाग wwwwwwwwna ०००० तयार केले होते....ते भरगच्ची असून त्यांचे काम अप्रतिम कलाकुसरीचे केले होते. त्या प्रत्येक तंबूची लांबी १२० फूट आणि रुंदी व उंची ६० फूट असून त्या प्रत्येकाची किंमत ५ लक्ष रुपये होती!!" असफउद्दौल्याच्या वैभवाचें असेंच वर्णन हॉज नामक प्रवाशानेही फार मौजेचें केले आहे. ह्यावरून असफउद्दौल्याची अशी विपुल संपत्ति पाहून पाश्चात्यांचे नेत्र दिपून जावेत आणि ईस्ट इंडिया कंपनीची अपहारबुद्धि जागृत राहावी ह्यांत मनुष्य स्वभावाच्या विरुद्ध असें कांही दिसत नाही. __ नबाब असफउद्दौला ह्याजबरोबर लॉर्ड कार्नवालिस ह्यांनी जो तह केला त्या तहाप्रमाणे बरेच दिवस सुरळीत राज्यव्यवस्था चालली, व नबाबाने बरीच लोकोपयोगी कामें करून प्रजेचा असंतोष नाहीसा करण्याचा यत्न केला. परंतु इ० स० १७९५ मध्ये लॉर्ड कॉर्नवालिस ह्यांची मुदत पुरी होऊन सर जॉन शोअर हे हिंदुस्थानचे गव्हरनर जनरल होऊन आले. ह्यांनी नबाबाच्या खजिन्याची स्थिति बरीशी नाही असे पाहून लखनौ येथे स्वतः आगमन केले; आणि नबाबास चांगला उपदेश करून त्याच्या राज्याचा नीट बंदोबस्त व्हावा म्हणून आणखी इंग्रज सैन्याची दोन पलटणे अयोध्येस ठेवल्याबद्दल त्याची कबुली मिळविली, व इंग्रज सैन्याचा खर्च सालीना ५॥ लक्ष रुपये आणखी अयोध्येच्या खजिन्यावर लादला! ह्याच वेळी सर जॉन शोअर ह्यांनी अयोध्येचा दरबारवकील तफझुल हुसेन ह्यास असफउद्दौल्याचा मुख्य प्रधान केले. ही व्यवस्था असफउद्दौल्याच्या इच्छेविरुद्ध असून, त्याच्या मनांत अलमासअल्ली खान नामक अनुभवी व शहाण्या मुत्सद्यास त्या पदावर आरूढ करण्याचा विचार होता. परंतु सत्तेपुढें शहाणपण नसल्यामुळे, त्यास गव्हरनर जनरल साहेबांच्या इच्छेप्रमाणे वागणे भाग पडले.