पान:अयोध्येचे नबाब.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ वा.] असफउद्दौला. पुरावा वॉरन हेस्टिंग्ज ह्यांनी आपले मित्र सर इलाजा उम्पे ह्यांच्या मदतीने तयार करून, त्यांच्या जहागिरी व संपत्ति जप्त करण्याचे काम सुरू केलें. बेगमांची जहागीर ३० लक्ष उत्पन्नाची होती, ती जप्त केली असतां कंपनीस पुष्कळ फायदा होईल अशा पापबुद्धीनें, ती असफउद्दौल्याकडून जप्त करविण्याचा निश्चय केला. ह्या सर्व गोष्टींस असफउद्दौल्याची मुळीच संमति नसून खुद्द लखनौचे रेसिडेंट मि० मिडल्टन ह्यांचीही त्याजकडून ही जप्ति सक्तीने अमलांत आणण्याची इच्छा नव्हती. शेवटी वॉरन हेस्टिंग्ज ह्यांच्या दुराग्रहामुळे त्यांना हे नीच कृत्य करणे भाग पडलें! “अयोध्येच्या जहागिरी, अन्यायाने, नवाबाच्या इच्छेविरुद्ध, जप्त केल्या म्हणून नबाबाचें मन उदास झालें व त्याची शरीरप्रकृति अगदी क्षीण झाली." असा मजकूर खुद्द अयोध्येचे रेसिडेंट ह्यांनी वॉरन हेस्टिंग्ज ह्यांस एका पत्रामध्ये लिहिला आहे. असफउद्दोल्याने अखेरपर्यंत बेगमांच्या जहागिरीची व संपत्तीची जप्ती करावी म्हणून स्वतः हुकूम दिला नाही. शेवटी मि० मिडलटन ह्यांनी लष्करी लोक बरोबर घेऊन फैजाबादेवर हल्ला केला, आणि गोमती नदीच्या काठी, आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस सुखाने क्रमीत असलेल्या, दोन राजस्त्रियांवर द्रव्यप्राप्तीस्तव त्यांनी सक्ती केली. त्यांस मदत करण्यास वॉरन हेस्टिंग्ज ह्यांच्या मर्जीतला व त्यांच्याच कृपेनें अयोध्येचे प्रधानपद धारण केलेला सरदार हैदरबेगखान हा तत्पर झाला. नंतर त्या उभयतांनी त्या पडदानशीन स्त्रियांवर व त्यांच्या वृद्ध द्वारसंरक्षकांवर अतिशय जुलम करून त्यांच्याकडून ७६ लक्ष रुपये काढले. ह्या वेळी त्यांनी जे अत्याचार केले त्यांचे वर्णन, बेगमांचा कैवारी वाचस्पति बर्क ह्यानें पार्लमेंटपुढे जे केले आहे, ते वाचून प्रत्येक सहृदय वाचकाच्या नेत्रांतून अश्रुधारा आल्यावांचून राहत नाहीत. त्या राजस्त्रियांचे क्लेश, त्यांचा मानभंग, त्यांची विटंबना, वगैरे गोष्टी 5