पान:अयोध्येचे नबाब.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ था.] सुजाउद्दौला. तो प्रांत सुजाउद्दौल्याच्याच ताब्यामध्ये ठेवावा." त्यामुळे ईस्ट इंडिया - कंपनीचे त्या वेळचे हिंदुस्थानांतील अधिपति लॉर्ड क्लाइव्ह ह्यांनी सुजाउद्दौल्याशी ता० १६ आगस्ट इ. स. १७६५ रोजी अलहाबाद येथे दोस्तीचा तह केला. ह्या तहामध्ये मुख्यत्वेकरून, शहाअलम बादशहाच्या तैनातीकरितां कोरा व अलहाबाद हे प्रांत इंग्रजांस द्यावेत; कासीम अल्ली व इतर युरोपियन लोक ह्यांस आपल्या राज्यांतून घालवून द्यावें; काशीचा राजा बळवंतसिंग याजकडे काशी व गाझीपूर वगैरे परगण्यांची जहागीर सुरळीत चालवावी ; आणि लढाईच्या खर्चाकरितां इंग्रजांस ५० लक्ष रुपये द्यावेत इत्यादि कलमें होती. ह्याप्रमाणे तह ठरून अयोध्येचा प्रबल नबाब सुजाउद्दौला इंग्रजांचा दोस्त बनला. वरील तहाप्रमाणे शहाअलम बादशहा अलहाबादेस राहिला व त्याचा निकट संबंध पुनः सुजाउद्दौल्याशी जडला, ही गोष्ट इंग्रजांस लवकरच संशयास्पद वाढू लागली. त्यांनी, सुजाउद्दौला हा सैन्य जमवून अलहाबाद व कोरा हे प्रांत घेण्याकरितां पुनः यत्न करील व त्याचे वर्चस्व कंपनीच्या उत्कर्षास अपायकारक होईल ह्या भीतीने, त्याच्या सैन्याची संख्या मर्यादित करण्याचा विचार केला. कलकत्त्याहून इंग्रजाचे तीन वकील जॉन कार्टियर, रिचर्ड स्मिथ व क्लॉड रसेल हे त्याची भेट घेण्याकरितां मुद्दाम काशीस गेले. तेथे त्यांनी सुजाउद्दौल्याशी गोड भाषण करून त्याजकडून अयोध्येच्या सैन्याची संख्या ३५ हजारपर्यंत नियमित केली. ही गोष्ट ता० २९ नोव्हेंबर इ० स० १७६८ रोजी झाली. ह्यानंतर सुजाउद्दौल्याने दोन तीन वर्षेपर्यंत कोणत्याही लढाईमध्ये फारसे लक्ष्य घातले नाही. परंतु पुनः त्यास राजकारणामध्ये पडण्याचा प्रसंग आला. पानिपतच्या अपयशामुळे अगदी खचून गेलेला मराठ्यांचा उत्साह