पान:अयोध्येचे नबाब.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૨૨ अयोध्येचे नबाब. [भाग राहत असे. ह्याच्या कारकीर्दीमध्ये रोहिल्यांचा उत्कर्ष व त्यांच्याशी युद्धे, अहमदशहा अबदाल्ली अथवा दुराणी ह्याच्या उत्तरेकडील स्वाऱ्या, फरकाबादचे नबाब ह्यांचे पुंडावे व त्यांशी युद्ध, आणि मराठ्यांचा रोहिलखंडांत प्रवेश ह्याच मुख्य गोष्टी घडून आल्या. त्याची संक्षिप्त हकीकत येथे सादर करणे अवश्य आहे. । रोहिले म्हणजे मूळचे अफगाण लोक. हे १८ व्या शतकाच्या प्रारंभी हिंदुस्थानांत आले व हळू हळू मोंगल सुभेदारांच्या साहाय्याने जेथें आश्रय मिळेल तेथें वसाहत करूं लागले. रोहिलखंड म्हणून जो प्रांत सध्या प्रसिद्ध आहे त्याचे पूर्वीचें नांव कठेर ( Katehr ) असें होतें. रोहिले लोकांनी तेथें वसाहत करून तो प्रांत बळकाविल्यामुळे त्यास पुढें रोहिलखंड असेंच नांव पडलें. रोहिश्यांचा मुख्य पुढारी अल्ली महमद नामक एक धाडसी व शूर पुरुष होता. ह्याने नादिरशहाच्या स्वारीमुळे व दिल्लीतील प्रमुख मुत्सद्यांच्या आपसांतील वैमनस्यामुळे मोगल बादशाहीचा कमजोर झालेला पाहून आपला अंमल बिजनोर, मुरादाबाद वगेरे प्रांतांमध्ये हळू हळू संस्थापित करण्यास सुरवात केली. ह्याचे पदरी अफगाण सैन्य बरेच होतें. त्याच्या साहाय्याने त्याने इ० स० १७४० मध्ये रोहिलखंडाचा बहुतेक भाग काबीज केला; आणि दिल्लीच्या निर्बल बादशहाची मर्जी संपादन करून त्या प्रांताची सुभेदारी मिळविली. इ० स० १७४० पासून इ०स०१७४५ पर्यंत रोहिलखंडावर त्याची स्वतंत्र सत्ता चालत होती. पुढे ती वाढविण्याची त्यास अनावर इच्छा झाल्यामुळे त्याने अयोध्या प्रांतामध्ये लूटमार व दंगेधोपे करण्यास प्रारंभ केला. ही गोष्ट तेथील नबाब सफदरजंग ह्यास अर्थातच रुचली नाही. त्याने त्यास बऱ्या बोलाने ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला; परंतु तो निष्फल झाला. तेव्हां त्याने दिल्लीस जाऊन, वजीर कमरुद्दीनखान