पान:अयोध्येचे नबाब.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ रा.] सादतखान. तेव्हां मिथ्या होईल. त्यास सादतखान आगरें सोडीनातसें देखोन आह्मी दिल्लीस जावयाचा निश्चय केला."* ह्यावरून सादतखान सामर्थ्यवान असन बढाई मारणाराही होता असें व्यक्त होते. ही मराठ्यांची मोहीम झाल्यानंतर पुढे तीन वर्षांनी इराणचा बादशहा प्रसिद्ध नादिरशहा ह्याने हिंदुस्थानावर स्वारी केली. त्या वेळी नादिरशहास दिल्लीवर चाल करून येण्याबद्दल निजामउल्मुल्क व सादतखान ह्यांनी पाचारण केले असा लोकप्रवाद आहे. ह्या उभयतांचा परस्परांविषयी मत्सर असून दिल्लीदरबारांत आपला पगडा बसावा अशी प्रत्येकाची इच्छा होती. ह्याच सुमारास वजीर खानदौरान अमीर उलउमरा हा मृत्यु पावल्यामुळे त्याची जागा रिकामी झाली होती, ती आपणास मिळावी म्हणून सादतखानाची फार मनीषा होती, व निजामउल्मुल्काचाही तिच्यावर डोळा होता. तेवढ्याकरितां सादतखानाने नादिरशहाशी सख्य जुळवून त्यास बादशहाकडून दोन कोटी रुपये देववितों असें कबूल केलें; व इकडे बादशहास सांगितले की, नादिरशहास दोन कोटी रुपये दिले असतां तो स्वदेशी जाण्यास तयार आहे. बादशहाने निजामउल्मुल्क यास नादिरशहाकडे मध्यस्तीस पाठविले. निजामउल्मुल्क याची व नादिरशहाची भेट झाली. त्याने दोन कोटी रुपये दिल्यास बादशहाशी स्नेह जोडून स्वदेशी परत जाण्यास आपण तयार आहों असें कबूल केले. निजामउल्मुल्क मोठ्या आनंदानें बादशहाकडे आला व त्याने झालेला वृत्तांत त्यास सादर केला. तो ऐकून बादशहा फार खुष झाला व त्याने त्यास 'अमीर उल-उमरा' हे पद अर्पण केले. नंतर बादशहाची व नादिरशहाची मोठ्या समारंभाने भेट झाली. नादिरशहाने त्याचे अत्यंत सन्मानपूर्वक स्वागत केले. रीतीप्रमाणे त्यांचे स्नेहभावाचे संभाषण होऊन * थोरले बाजीराव पेशवे यांचे अस्सल पत्र-धावडशी दप्तर.