पान:अयोध्येचे नबाब.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ ला.] अयोध्या-देशस्वरूप व प्राचीन माहिती. सुभ्याच्या राजधानीचे ठिकाण एकच कायम ठरलेलें नसे. सुभेदारांची बदली तीन चार वर्षीच्या आंतच बहुतकरून होत असे. शिवाय कित्येक सुभेदार बादशहाच्या मर्जीतले असल्यास दिल्लीदरबारीच राहत असत, व सुभ्याचा वसूल घेण्यापुरते त्या प्रांतांत जात असत. सादतखानाकडे अयोध्येची सुभेदारी आल्यानंतर तोही बरीच वर्षे दिल्लीदरबारांत होता. त्याचप्रमाणे त्याचा वारस मनसूरअल्ली सफदरजंग हाही दिल्लीस होता. अयोध्येची राजधानी फैजाबाद ही सुजाउद्दौल्याचे कारकीर्दीत झाली व लखनौ येथें असफउदौल्याने गादी संस्थापित केली. सादतखानाच्या कारकीर्दीपासून अयोध्येचा इतिहास विश्वसनीय असून फार महत्त्वाचा आहे. दिल्लीची सार्वभौमसत्ता विलय पावून हिंदुस्थानांत जी स्वतंत्र राज्ये निर्माण झाली त्यांपैकी हैदराबाद आणि अयोध्या ही दोन फारच बलाढ्य होत. मराठ्यांच्या राष्ट्राचा उत्कर्ष होऊन त्यांच्या सत्तेने सर्व हिंदुस्थान व्यापून टाकिलें, तरी ह्या दोन प्रचंड राज्यांनी आपले स्वातंत्र्य नष्ट होऊ दिले नाही. मराठ्यांस अविच्छिन्न सार्वभौमत्व स्थापन करण्यास उत्तरेकडे अयोध्येचे नबाब व दक्षिणेकडे हैदराबादेचे निजाम हे दोन प्रतिस्पर्धी बरेच त्रासदायक झाले, व कांही अंशी त्यांच्याच योगानें परद्वीपस्थ लोकांस हिंदुस्थानांत प्रबल होण्यास संधि सांपडून, त्यांच्याच साहाय्याने महाराष्ट्रसत्तेचा विध्वंस करण्यास त्यांस अधिक सुगम झाले, असे म्हटले असतां अतिशयोक्ति होणार नाही. ह्या दृष्टीने अयोध्येचा इतिहास महत्त्वाचा आहेच, तथापि तेथील नबाबांची चरित्रे त्यांच्या विशिष्ट गुणांमुळे फार महत्त्वार्ची असून त्यांत अयोध्येच्या इतिहासांतील अत्यंत मनोरम व अप्रसिद्ध माहिती व्यक्त होत असल्यामुळे ती क्रमशः आम्ही सादर करितो.