पान:अयोध्येचे नबाब.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ अयोध्येचे नबाब. [भाग राज्यांतील अव्यवस्थेसंबंधानें व जुलमासंबंधानें कर्नल स्लीमन व जनरल औट्राम ह्यांनी जे आरोप आणिले होते, ते असत्य आहेत असे दाखविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. त्या योगाने अनेक नवीन गोष्टी बाहेर येऊन, त्यांत नबाबाच्या पक्षास अनुकूल असा इंग्रजी कागदपत्रांचा पुरावाही प्रसिद्ध झाला आहे. त्यावरून नबाबाच्या पक्षास बरीच पुष्टि येते; व इंग्रज अधिकाऱ्यांची कृति अन्याय व स्वार्थेच्छा ह्यांच्या विरहित नव्हती असें मानण्यासही जागा मिळते. परंतु ज्या अर्थी कांहीं निःपक्षपाती व सत्यप्रिय इंग्रजलोकांनी एतद्देशीय राज्ये खालसा करण्याच्या विरुद्ध आपले मत प्रदर्शित केले आहे; त्या अर्थी ह्या राज्यकारणाच्या गोष्टींची आतां चर्चा करण्यांत अर्थ नाही. तथापि, 'कांहीं गुण सोन्याचा व कांहीं सोनाराचा' ह्या म्हणीप्रमाणे, लखनौ संस्थानच्या बाबतींत प्रकार झाला असें समदृष्टीच्या माणसास वाटल्यावांचून राहत नाही. इंग्रज अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे, अयोध्येची स्थिति अत्यंत दुर्धर नसली, तरी ती समाधानकारक नव्हती हे जितकें खरे आहे, तितकेंच अयोध्येच्या नबाबाचा पूर्वापार चालत आलेला तह रद्द करून व त्यांचे उपकार एकीकडे ठेवून ते सर्वस्वी खालसा करण्यापेक्षां, तें कायम ठेवून त्यांत सुधारणा केली असती, तर आधिक चांगले झाले असते, हेही खरे आहे. हे सिद्ध करून दाखविण्यास महाराष्ट्रांतील एका प्रतिष्ठित व राजमान्य सरदाराची साक्ष ह्या वेळी लक्ष्यांत घेण्यासारखी आहे. हे सरदार श्रीमंत रघुनाथराव अण्णासाहेब विंचुरकर हे होत. हे बंडाच्या अगोदर काही दिवसांपूर्वी स्वतः लखनौस गेले होते व त्यांनी वाजिदअल्लीशहाची कारकीर्द समक्ष पाहिली होती. त्यांच्या प्रवासाचे वर्णन अयाध्येचे राज्य खालसा झाल्यानंतर कित्येक वर्षांनी प्रसिद्ध झाले आहे. त्यांत पुढील लेख सांपडतो: