पान:अयोध्येचे नबाब.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ वा.] महमदअल्लीशहा. करावी. परंतु ह्याप्रमाणे सुधारणा न होतां, राज्यामध्ये अंदाधंदी. जुलम अथवा अव्यवस्था झाली व ह्यापुढे कोणत्याही वेळी कोणत्याही कारणाने अयोध्येच्या शांततेचा भंग झाला, तर नबाबाच्या राज्यांत हात घालण्यास व त्याची व्यवस्था करण्यास ब्रिटिश सरकारास हक्क आहे.” हे कलम ह्या तहांत अंतर्भूत झाल्यामुळे ह्याने नबाबाचे बहुतेक स्वातंत्र्य नष्ट झालें, व हाच तह अयोध्या संस्थान खालसा करण्यास लॉर्ड डलहौसी साहेबांच्या कारकीर्दीत उपयुक्त झाला, हे निराळे सांगावयास नकोच. हा तह झाल्यानंतर ह्यांतील सर्व कलमें पुढे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स ह्यांच्याकडे गेली. तेव्हां ती इंग्रजी राज्यपद्धतीच्या हेतु ( Policy ) विरुद्ध असल्यामुळे ती त्यांनी नामंजूर करून, नबाबाचे व ब्रिटिश सरकाराचे सर्व संबंध इ० स० १८०१ च्या तहाप्रमाणे पूर्ववत् कायम ठेवावे असे ठरविले. परंतु ही गोष्ट नबाबास कळली नाही! नबाब महमदअल्लीशहा हा गादीवर बसला त्या वेळी बराच वयोवृद्ध झाला होता व त्याचे बहुतेक दिवस एकांतवासांत गेले होते; परंतु लहानपणी त्यास त्याचा बाप सादतअल्ली ह्याच्या कारकीर्दीत राजकीय शिक्षण बरेच प्राप्त झाल्यामुळे तो बराच शहाणा, मितव्ययी, सभ्य आणि कर्तव्यतत्पर असा झाला होता. तो गादीवर आल्यानंतर गवयांचे व खुषमस्कऱ्यांचे साम्राज्य बंद झाले. त्याने नासिरउद्दीनाचा प्रधान रोषनउद्दौला ह्यास प्रथमतः दूर करून राज्यांतील जना, माहितगार व अनुभवी दिवाण हकीम मेहेंदी ह्यास प्रधानगिरीची वस्त्रे दिली. परंतु तो वार्धक्यामुळे शक्तिहीन व बुद्धिहीन झाल्यामुळे, त्याचा राज्यसुधारणेच्या कामी विशेष उपयोग न होतां तो लवकरच मृत्यु पावला. त्याच्या मागून त्याने झकीरउद्दौला ह्यास प्रधान गिरीची वस्त्रे दिली; परंतु तोही बिचारा लवकरच मृत्युमुखी पडला.