पान:अमेरिका पथदर्शक.pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३८
अमेरिका-पथ-दर्शक

रूप पाहून जरूर भासेल त्याप्रमाणें काम करण्यास आरंभ केला पाहिजे. चिनी व जपानी लोक असेंच करीत आले आहेत. त्यांना त्यांच्या उद्योगांत यशहि मिळालें आहे; अर्थात् अशा प्रकारें काम केल्यास आम्हांसहि यश मिळाल्याशिवाय राहणार नाहीं.

 प्रश्न ३४--अमेरिकेंत आपलें लोक व्यापारांत गुंतले आहेत काय? असल्यास ते कोणता व्यापार करतात ?

 उ०--होय, आहेत. पूर्वभागांत न्यूजॅरेजी नांवाचें संस्थान आहे. त्यामध्यें बरेचसे मुसलमान बंधू फेरीवाल्याचा धंदा करीत असतात. न्यूयार्क बोस्टन वगैरे शहरांतहि कांही हिंदी लोक इकडचा तिकडचा माल आणून विकतात व द्रव्यार्जन करतात. दक्षिण भागांतील संस्थानांत बरेच पठाण आहेत; ते येथून शाली वगैरे मागवून तेथें व्यापार करतात; व बरेंच धन मिळवितात. परंतु हिंदु लोकांना तर सोंवळ्या ओवळ्यांच्या कल्पनांनी भारून टाकलेलें आहे. ज्यांनी ह्या कल्पनांना झुगारून देऊन अमेरिकेंत प्रवेश केला, तेहि मजुरीपेक्षां आधिक महत्त्वाचा धंदा करीत नाहीत. पंजाबांतील शीख शेतक-यांस व्यापारांतील मर्म काय कळणार? हा धंदा तर मारवाडी, कायस्थ किंवा वैश्य लोकांचा आहे. ह्याकरितां ज्यांना ईश्वरानें थोडीबहुत बुद्धि दिली आहे, अशा व्यापारी पेशाच्या लोकांनी अमेरिकेंत जाऊन मुसलमानांप्रमाणें द्रव्यार्जन करण्यास सुरुवात करावी. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत असे एकहि शहर नाहीं कीं जेथें थोडे देखील जपानी लोक नाहीत. हे लोक तेथें जाऊन जमिनी विकत घेतात, वसाहती करितात, दुकानें उघडतात व अशा प्रकारें निरनिराळे व्यवसाय करून आपल्या देशाचा फायदा करतात. हिंदी मनुष्यांनी अद्याप असें केलें नाही. ह्याचें कारण हेंच कीं, शिकलेल्या मंडळीचें ह्या गोष्टीकडे अजून लक्ष गेलें नाहीं. आमच्या देशबंधूंनीं इकडे लक्ष पुरवून आपल्या देशाचें दारिद्र्य घालविण्याचें उद्योगास लागावें अशी माझी परमेश्वरांस नम्र विनंति आहे.
 ह्याबरोबरच मला हेंहि सांगितलें पाहिजे कीं, जे अमेरिकेंत व्यापार करीत आहेत, ते आपणांस भारतीय न म्हणवितां अफगाणिस्तान किंवा परशियाचे रहिवाशी म्हणवून घेतात. कारण,भारतीय म्हणविल्याने त्यांच्या कामांत बराच व्यत्यय येतो, ह्यांतील मर्म काय हे विचारी माणसांस सहज कळून येईल.