पान:अमेरिका पथदर्शक.pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३७
प्रश्र्नोत्तरें.

एशियाटिक लोकांचा फार द्वेष करतात. हाच अमेरिकेतील वर्णविषयक निर्बंध समजा.
 प्रश्न ३२--हिंदुस्थांनातील कोणत्या वस्तु अमेरिकेंत नेल्यापासून फायदा होतो ?
 उ०--हिंदुस्थानांतील पितळी भांड्यांना अमेरिकेंत फार किंमत येतें. लांकडी व हस्तिदंती वस्तूंहि अमेरिकन लोकांस फार आवडतात, परंतु कोणाहि हिंदी बांधवास अशा वस्तू आपल्याबरोबर तेथें घेऊन जाण्याचा सल्ला मी देणार नाहीं. नवख्या माणसानें अशा वस्तू तिकडे नेल्यास त्याचें नुकसान फार होईल. तेथें मजुरीचा दर इतका मोठा असतो की, नुकसान होण्याचीच फार भीति असते. हिंदुस्थानांत सर्वत्र फिरून ह्या वस्तूंच्या भावाची चांगली चवकशी करावी; व ह्या वस्तु विकणा-या व्यापा-यांशी परिचय करून ठेवावा. अमेरिकेंत गेल्यावर व तिकडे लोकांशी ओळखी झाल्यावर वरील वस्तु मागविण्याची व्यवस्था करावी. ह्या रीतीनें काम केल्यास पुष्कळ फायदा होऊं शकेल. काम करावयाचें असल्यास साधनेंहि उपलब्ध होतात. कांहीं तपास किंवा विचारपूस न करतां एकदम वस्तू घेऊन जाणें व मग त्यांच्या खपाकरितां इकडे तिकडे भटकणें अत्यंत नुकसानीचें असतें.
 प्रश्न ३३--अमेरिकेस गेल्याने व्यापारी लोकांस कांही फायदा होऊं शकेल काय ?
 उत्तर--हिंदी व्यापा-यांनीं एकदां तरी अमेरिकेस जावें, अशी त्यांस मी अवश्य विनंती करीन. तेथें व्यापार कसा काय चालतो ह्याचें त्यांनीं सूक्ष्म निरीक्षण करावें. ह्यासंबंधीं विशेष स्पष्टपणें कांहीं सांगतां येणार नाही. कारण, ह्या बाबी प्रत्यक्ष पाहावयाच्या असतात. अमेरिकेंत जे व्यापार करतात किंवा ज्यांचा परदेशाशीं व्यापार चालतो ते स्वतः परदेशांत जातात व ह्यासंबंधीची माहिती मिळवितात. अमेरिकेस जाऊन तेथें ज्यांना थोड्या भांडवलांवर व्यापारास सुरुवात करावयची असेल, त्यांनी जपानी लोकांप्रमाणें कार्यास आरंभ केला पाहिजे. फळाची लहान लहान दुकानें, चिरूट, सदरे, कॉलर इत्यादि वस्तु विकण्याचीं दुकानें काढून किंवा 'बिलियर्ड रूम'उघडून आपल्या कामास सुरुवात करावी. नंतर हळु हळु भांडवल वाढवून अधिक महत्त्वाचीं कामें हातांत घेतां येतील. ह्या सर्व गोष्टी घडून येण्याकरतां तेथें गेलें पाहिजे, व मग तेथील रंग-