पान:अमेरिका पथदर्शक.pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५
मी अमेरिकेस कसा पोहोंचलों

त्यांच्यामध्यें एकी हा देखील गुण नव्हता. एखाद्या वेळीं दोनचार हिंदी मजूरांना इतरांनी खूप मार दिला तरी इतर भारतीय मजूर त्यावेळीं त्याच्या मदतीला धाऊन जात नसत. उलट तमाशा पहात उभे राहण्यांत त्यांस मौज वाटे. चिनी मजूर अफू खाण्यांत तर्र असत. परंतु त्यांच्यामध्यें 'एकी' हा गुण विशेषत्वानें होता. जेव्हां एखाद्या चिनी मजूरावर एखादे संकट येई,तेव्हां सर्व चिनी मजूर त्याच्या मदतीकरितां धाऊन जात.जपानी मजूरांविषयीं तर कांहीं बोलावयासच नको. ह्यांच्याजवळ इंग्रजी शिकण्याची पुस्तकें होती, हें लोक इंग्रजी शिकण्यांत आपला वेळ घालवीत असत. ह्याशिवाय जिजित्सु इत्यादि जपानी खेळ खेळण्यांत रोज दोन तास घालवून ते आपलें मन रमवीत असत. संख्येनें जपानी मजूर सर्वांत अधिक होते, तरी तें सर्व शांत असून परस्परांशीं प्रेमानें वागत होते. ते कोणत्याही प्रकारें भांडण तंटे करीत नसत. हिंदी मजूरांना मद्य पिऊन धिंगाणे घालतांना पाहून जपानी मजूरांस फार वाईट वाटत असे. आमच्या कांहीं बेवकूफ बंधूंनी तर जपानी स्त्रियांशी बोलतांना असभ्य व लज्जास्पद भाषा वापरण्यासहि कमी केलें नाहीं.त्यांचें तें किळसवाणें भाषण ऐकून मला भारीच वाईट वाटलें व मी त्यांपैकीं कित्येक बेवकूफांना चांगला चोपही दिला.
 ह्याप्रमाणें आमचा एक एक दिवस जाऊन आम्ही अमेरिकेच्या आधिकाधिक जवळ जाऊं लागलों. ह्या दिवसांत पॅसिफक महासागर अतीशय शांत असतो. ह्यामुळे तुफान किंवा वादळ उठले नाही. जहाजहि फार मोठें होतें. ह्यामुळे कधीं कधीं वारा वाहूं लागला तरी त्यापासून आम्हांस फारसा त्रास होत नसे. २८ मेला आमचें जहाज व्हंकोव्हरला जाऊन पोहोचलें व पुष्कळ उतारूं डॉक्टर तपासणीकरितां थांबले. ह्या बंदरावर अडाणी मनुष्यास फसविण्याच्या अनेक युक्त्या आहेत. मला कोणी कांहीं म्हटलें नाहीं. कोणाकडूनहि प्रतिबंध न होतां मी जहाजांतून उतरून सरळ शहरांत गेलों.
 वाचकहो, अमेरिकेस कसा पोहोंचलों, ह्याची हकीकत येथें संपली. अधिक सूचना तद्वतच अमेरिकेच्या परिस्थितीचा विचार ह्याच पुस्तकांत ह्यापुढें करण्यांत येईल. इतकें सांगून प्रवासाची ही रामकहाणी येथेंच संपवितों.

सत्यदेव.


---------