पान:अमेरिका पथदर्शक.pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४
अमेरिका-पथ-दर्शक

ह्या गाडीत बसलें असतां आनंद वाटतो व थोडें भयहि वाटतें. ह्या गाडीच्या योजनेंत स्थापत्यशास्त्रांतील बरेंच कौशल्य दिसून येतें.
 ज्या वेळीं आमची नाव जहाजाजवळ पोहोंचली व आम्ही शिडीवरून जहाजावर चढूं लागलों, तेव्हां जहाजावरील नांवाडयानीं जहाजावरील मोऱ्यांतील घाणेरडें पाणी दुष्टपणानें आमच्या अंगावर सोडले.त्या घाण पाण्यानें ओलें झाल्यावर, आम्ही वर जाऊन पोहोंचलों व आपआपली निजण्याबसण्याची व्यवस्था केली. हांगकांगपासून व्हँकोव्हरला जाण्यास सुमारें २८ दिवस लागतात. ह्याकरितां जहाजवाल्यांनी डेकच्या प्रवाशांस निजण्याकरितां खालच्या भागांत एक एक माणसांस निजतां येईल अशा लांकडी फळ्या ठेविलेल्या होत्या. अशीच व्यवस्था बहुधा सर्व जहाजांवर असतें.
 आमचें जहाज हालूं लागलें व आम्ही हळू हळू हांगकांगपासून दूर दूर जाऊं लागलों. शँघाईपर्यंत प्रवाशांची संख्या वाढली नाही. परंतु कोबे व योकोहामा येथे बरेचसे जपानी प्रवासी आमच्या जहाजावर चढले. हें डेकवरील उतारूं होतें तरी त्यांचे पोषाख स्वच्छ व नीटनेटके होते. डोक्यावर अमेरिकन टोप्या घातल्यामुळे सभ्य गृहस्थांत त्यांची गणना झाली होती. एकीकडे आमचे लोक मळलेले व घाणेरडें कपडे घालून अमेरिकेस चालले होते, व दुसरीकडे जपानी मजूर अमेरिकन पोशाखांत द्रव्यार्जनाकरितां अमेरिकेस जात होते. हा देखावा पाहून मला फार वाईट वाटलें. कारण जपानी मजूरांची वागणूक एखाद्या उन्नत जातीला साजेशी होती व आपल्या शत्रूकडूनही ते वाखाणले जाण्यास सर्वथेव योग्य होते. ह्याच्या उलट, आमच्या मजूरांकडे पाहून मनांत किळस उत्पन्न होई;व किळस तरी कां न यावी? ह्याच कारणामुळे तर आमची सर्व जगांत छीः थू: होतें. आळसानें आमच्या सर्व कार्यांत एक भयंकर विघ्न उत्पन्न करून ठेविलें आहे. ह्या जहाजावर तीन देशांचे-भारत, चीन व जपान ह्या देशांचे-मजूर होतें. विचारी माणसांस ह्या तीन देशाची स्थिति समजून घेण्यास येथें जहाजावरच साधन सामुग्री होती, भारतीय मजूरांकडे पाहून अम्हीं जगांतील सुधारलेल्या देशाच्या किती तरी मागें आहोंत असें वाटे. जहाजावर सर्व चाळीसच हिंदी मजूर होते. परंतु ते सर्व आपला वेळ भांडण, तंटे व मद्यपान अशा वाईट कामांत घालवीत होतें.परस्परांविषयीं प्रेम व सहानभूति त्यांच्यात मुळीच नव्हती