पान:अभिव्यक्ती.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४ / अभिव्यक्ती त्यांनी आपले कार्यक्षेत्र निश्चित केले होते. ते म्हणजे प्राचीन मराठी संत- वाङमयाचा रसोद्ग्राही व चिकित्सक अभ्यास ! तुकाराम, मोरोपंत यांच्यावर त्यांची विशेष भक्ती. तशातही ज्ञानेश्वर, एकनाथ, अर्थातच त्यांच्या या वाङ्मयीन कर्तृत्वामुळेच त्यांचे नाव महाराष्ट्रात सदैव गाजत राहील यात शंका नाही. आज उपलब्ध असलेल्या त्यांच्या ४० च्या आसपासच्या ग्रंथांशिवाय श्रीकृष्ण व रामाचे चरित्र जनसामान्यांसाठी त्यांना लिहावयाचे होते; पण त्यांचा तो संकल्प पूर्ण होऊ शकला नाही. त्याचप्रमाणे मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहीत असताना खंड एक ते तीन ( ज्ञानेश्वर ते रामदास ) पर्यंतचाच भाग ते पूर्ण करू शकले; अर्थात विशेष ' आवडी' त्यांना नसलेला अर्वाचीन कालखंडच अपूर्ण राहिला. संतवाङ्मयाकडे समाजाचे लक्ष वेधून तद्द्द्वारा वाचकांना आत्मशांती प्राप्त करून देण्याचे अत्यंत पुण्य- प्रद असे कार्य पांगारकरांनी केले. प्रचंड संतवाङ्मयाचे एक विद्वान गाढे अभ्यासक - म्हणून त्यांना मानाचे स्थान द्यावे, एवढी त्यांची साहित्यसेवा मोठी आहे. विद्यार्थीदशेपासूनच नित्य अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी व इंग्रजी वाङमय पांगारकर आवडीने वाचीत असत. त्या वाङ्मयातील सुंदर सुंदर उतारे काढणे, ते कंठस्थ करणे, फलकावर लिहून नेहमी डोळ्यांसमोर ठेवणे हा पांगारकरांचा सतत ध्यास होता. या उद्योगाशिवाय आपले दैनंदिन व्यवहार पार पाडीत असताना म्हणजे उठता, बसता, फिरताना ते पाठ असलेले काव्य सतत गुणगुणत असत. ही त्यांची लकब होती. ' या सवयीमुळे इतरांनी गुणगुणण्याजोगी वचने त्यांच्याही लेखनात आढळतात ' असे कै. मामासाहेब दांडेकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे. ४ उतारे वाचीत असताना त्यांचा आवाज कातर होई तर कंठ अनेकदा दाटून येत असे व डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहात असत. यावरून त्यांच्या सहृदय, अतिसंवेदनाक्षम अंतःकरणाची कल्पना येते. मोरोपंतांची पाच हजार आणि एकनाथ व इतर संतांची असंख्य पदे त्यांना मुखोद्गत होती. त्यांच्या या निःसीम श्रद्धेतून व भाविकतेतूनच त्यांची संतचरित्रे निर्माण झाली. इ. स. १८९८ मध्ये पांगारकरांनी लेखनाला जो आरंभ केला तो थेट आयुष्याच्या अखेरपर्यंत ! साडेतीन तप त्यांची ही वाङमयसाधना चालू होती. आणि विशेष म्हणजे पांगारकरांनी हे सारे लेखन आपल्या स्वतःच्या हातांनी केले. त्यांच्या या कमालीच्या परिश्रमाची व दिपवून टाकणाऱ्या व्यासंगाची साक्ष त्यांची ग्रंथसंपदा आहे. 'मोरोपंत चरित्र व काव्यविवेचन सारख्या ग्रंथात तर त्यांच्या संस्कृत भाषेवरील प्रभुत्वाची प्रचीती येते. महाराष्ट्रातील सर्वांना पांगारकरांच्या सुमधुर व रसाळ वाणीचा, उभ्या हयातीत एकनिष्ठेने केलेल्या साहित्यसेवेचा लाभ झालेला ४. पांगारकर सूक्तिसुमने वि. व्यं. कंचोळे. प्रस्तावना: कै. मामासाहेब दांडेकर (अप्रकाशित )