पान:अभिव्यक्ती.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एक

ललित साहित्यातील पौराणिकता  ललित साहित्यातील पौराणिकता म्हणजे नेमके काय ? ऐतिहासिकता आणि पौराणिकता यांच्या ललित साहित्याच्या निर्मितीसंदर्भातील निबंध आणि मर्यादा कोणत्या ? पौराणिक साहित्याचे नेमके सामर्थ्य कशात आहे ? तिच्या यशापयशाचे आणि कलात्मक, अकलात्मकतेचे मापन कसे करावयाचे ? पौराणिक कलाकृतीचे गमक कोणते ? हे आणि यांसारखे कितीतरी प्रश्न या विषयाचा विचार करीत. असताना निर्माण होतात.
पौराणिक ललित साहित्याचे स्वरूप  कोणतीही साहित्यकृती ही पहिल्यांदा 'साहित्य, कला' असते आणि मग तिच्या स्वरूपावरून सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, पौराणिक, ग्रामीण, प्रादेशिक इत्यादी ठरविली जाते. साहित्यातील पौराणिकतेचा विचार करीत असताना हे लक्षात येते की 'पुराणा' वर आधारित ही कृती असते. पौराणिक वास्तवाला किंबहुना 'पुराणा' चे म्हणून जे काही सत्य आहे त्या पौराणिक सत्याला गोचर करते, सजीव करते ती पौराणिक कलाकृती.
 पौराणिक कथा, व्यक्ती, घटना, प्रसंग यांची नवनिर्मिती करून, सर्जनशील ( creative ) उभारणी करून जो आशय आणि जे एक वास्तव अभिव्यक्त होते त्यातून माणसाचे आणि माणसाच्या मनाचे, पर्यायाने जीवनाचे चित्र साकार होते. असे जीवन चित्र साकार करते ती पौराणिक साहित्यकृती असते असे म्हणता येईल.
 कोणताही आणि केव्हाही कलाव्यवहार हा सत्यापासूनच सुरू होतो, मग ते सत्य प्रत्यक्ष जीवनातील असेल, वास्तवातील असेल ऐतिहासिक कृतीत 'ऐतिहासिक' किंवा 'पौराणिक' कृतीत 'पौराणिक' सत्य असेल. आता पौराणिक सत्य म्हणजे काय ? असा प्रश्न निर्माण होतो. त्याचा पुढीलप्रमाणे विचार करता येईल.