पान:अभिव्यक्ती.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३० / अभिव्यक्ती जाणवते. या दृष्टीने प्रस्तुत ठिकाणी केशवसुतांच्या कवितेतील वैचारिकतेवर लक्ष केंद्रीत करावयाचे आहे.
कालसापेक्ष गुणधर्म : अनुभवधन
 'केशवसुत ' कविमन ज्या विशिष्ट काळात वावरत होते, त्या काळातील सामाजिक, वैचारिक जाणिवांनी त्यांच्या अनुभवविश्वाचे महत्त्वाचे अंग व्यापलेले दिसून येईल. आणि तसे होणेही साहजिकच आहे. केशवसुतांच्या कवितेतील वैचारिकता, सामाजिक जाणिवा यांमागे हेच संस्कारित मन होते. जीवनातील विविध सौंदर्यांचा आणि सामर्थ्यांचा ध्यासच या मनाला भारावून टाकीत होता.
 तत्कालीन महाराष्ट्र जीवन अनेक दृष्टीने त्याला कारणीभूत असल्याचे केशव- सुतांच्या कवितेच्या स्वरूपाकडे पाहूनच म्हणता येते. अनेक दृष्टीने संपूर्ण समाजातील वातावरण तप्त होते. सगळीकडे प्रक्षोभ आव्हान - उपासना, त्यागाचीच भाषा ! टिळक, आगरकर, हरी नारायण, गो. ब. देवल यांनी आपापल्या क्षेत्रात जे कार्य केले तेच केशवसुतांनी कवितेच्या क्षेत्रात केले असे आढळेल. कारण हा गुणधर्म त्या विशिष्ट कालखंडाचाच होता. या नव्या दिशेने काव्यलेखन करण्याचा थोडाबहुत, भलाबुरा . प्रयत्न केशवसुतांच्या पूर्वीही होत होता - नाही असे नाही; परंतु त्यांना नेमकी दिशाच गवसत नव्हती. ह्या प्रयत्नांचे स्वरूप काहीसे चाचपडण्याचेच होते असे म्हणता येईल. केशवसुतांनी हेच कार्य केले. जे अनिश्चित, असंघटित, क्षीण होते त्याला निश्चित, संघटित केले, सामर्थ्य दिले, नवीन दिशा प्राप्त करून दिली.

'फोले पाखडिता तुम्ही निवडतो ते सत्त्व आम्ही निके'

हे पटवून दिले.
 असे असूनही केशवसुतांनी लिहिलेल्या साऱ्याच कविता कलादृष्ट्या श्रेष्ठ आहेत असे म्हणता येत नाही. कलादृष्ट्या सरस व नीरस दोन्हीही प्रकारच्या कविता केशवसुतांनी लिहिल्या. केशवसुतांनाही प्राथमिक अवस्था होती. विशिष्ट अवधीनंतर लिहिलेल्या कविताच श्रेष्ठ ठरल्या. त्यासाठी काही काळ जावा लागला. अनुभवाच्या आधाराने जीवनाकडे पाहाण्याचा खास केशवसुतांचा जो दृष्टिकोन आहे तो नंतरच प्रगट झाला.

'चतकोरीने मला न सुख खादाड असे माझी भूक '

हीच त्यांची जीवन लालसा ! या नव्या युगाचे चिंतन - काहीसे प्रगट का होईना - पण त्यांनी केले होते. त्यांच्या कवितेत वैयक्तिक जाणिवा अथवा आत्मपरता असली तरी केशवसुतांनी केवळ स्वतःच्याच जीवनाचा विचार केला होता असे म्हणता येत नाही.