पान:अभिव्यक्ती.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सहा

केशवसुतांच्या कवितेतील वैचारिकता

भूमिका

 खऱ्या कवितेतून साकार होणाऱ्या अनुभवाचे स्वरूप भावोत्कट काव्यात्म असते, अनन्यसाधारण वा अलौकिक असते. कवितेची अथवा कोणत्याही कलाकृतीची व्याख्या करावयाची झाल्यास pictured experience केवळ या दोन शब्दांतही करता येईल.
 कवितेत अनुभव साकार केलेला असतो. अर्थातच हा अनुभव अनेक घटकांचा ( व त्यांच्या विशिष्ट कमी - जास्त प्रमाणांसह ) बनलेला असतो. विचारसंवेदना, भावना हे त्या अनुभवातील सहज लक्षात येणारे दोन महत्त्वाचे घटक.
 प्रस्तुत लेखात केशवसुतांच्या कवितेतील वैचारिकतेचा शोध घ्यावयाचा आहे.
 ज्या अनुभवामध्ये 'विचार' या घटकाला प्राधान्य असते, त्या प्रकारच्या अनुभवाला साकार करणारी कविता; जिला स्थूलमानाने वैचारिक कविता आपणास म्हणता येईल. ज्या पद्धतीने काव्यानुभवातील घटकांचा सुटा विचार विवेचन करीत असताना केला जातो. अर्थातच तसे ( सुटे - अलग) स्वरूप अनुभवातील घटकांचे असत नाही. अनुभवातील घटक एकजीव एकात्म असतात. अनुभवाच्या होणान्या जाणिवेच्या आधारानेच विचारानुभव ( वैचारिक कविता ) वा भावानुभव ( भाव- कविता) हे आपणास सांगता येते.  केशवसुत हे मराठी अर्वाचीन कवितेचे जनक - कुलगुरू. त्यांच्या कवितेचा अनेक दृष्टीने विचार केला गेला आणि केला जात आहे.
 मराठी कवितेतील वैचारिकतेच्या परंपरेकडे पाहिल्यास त्याही बाबतीत केशवसुताची कविता वैशिष्ट्यपूर्णच ठरते. अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली केशवसुतांची कविता 'वैचारिक कविता' म्हणूनदेखील श्रेष्ठ दर्जाची ( समृद्ध ) ठरते. मराठीत खऱ्या अर्थाने जिला वैचारिक कविता म्हणता येईल तिची वानवाच