पान:अभिव्यक्ती.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६ / अभिव्यक्ती पण कलात्मक नाट्यांतर्गत न्याय अबाधित राहावा हीच अपेक्षा असते. कलात्मकतेला बाधा येऊ न देण्याचे हे दुसरे महत्त्वाचे पथ्य मामा वरेरकरांना कधीच सांभाळता आले नाही. कलाकृतीतील हेतू नेहमी स्वभावत: कलावगुण्ठित असावा. पण वरेरकरांना हे कलावगुण्ठण कुठेही साधले नाही.
 'मोलिअर' या इंग्रजी नाटककारांच्या संप्रदायात मामा वरेरकरांचा अनेकदा समावेश केला जातो; परंतु तिथे जाणवणारा फरक म्हणजे मोलिअरच्या नाटकातील हेतू कलावगुंठित असतो. त्यात कलात्मक अलिप्तपणाची ( artistic detachment ) प्रचीती येते. म्हणूनच मोलिअरच्या नाटकात सहजता, स्वाभाविकता प्रत्ययाला येते. मोलिअर आणि वरेरकर यांतील हे अंतर लक्षात घेतले म्हणजे उत्कृष्ट नाट्यदृष्टी असूनही वरेरकरांच्या पदरी येणाऱ्या अपयशाचे मर्म लक्षात येते. यामुळेच त्यांची नाटके प्रमेयात्मक व प्रहसनवजा ठरत असली तरी कलादृष्ट्या श्रेष्ठ ठरू शकत नाहीत.
 याचा जर थोडा अधिक सूक्ष्मपणे विचार केला तर असे आढळेल की, वरेरकरांच्या मूळ प्रकृतीतच हा गुणधर्म नाही." त्यामुळेच त्यांच्या नाटकावर कलावंताच्या समतोलपणापेक्षा प्रचाराचाच अभिनिवेश जास्त आहे," असा जो आक्षेप घेतला जातो त्याचे कारणही उलगडू शकेल.
 "प्रत्यक्ष पाहिलेल्या आणि घडलेल्या प्रसंगांना ( आवश्यकतेनुसार ) जरुरीप्रमाणे तीव्र किंवा मोहक स्वरूप देऊन लिहिण्याचा माझा प्रघात आहे." अगदी स्पष्टपणे वरेरकरांनी हे जाहीर केलेले आहे. त्यामुळेच त्यांची नाटके तात्कालिक स्वरूपाची ठरण्याची भीती वाटते. घटनाप्रसंगांचे प्रासंगिक वा तत्कालीन महत्त्व लक्षात घेऊन वरेरकर त्या विषयाला आपल्या नाटकाची कथावस्तू बनवितात. त्या समस्येला वस्तुनिष्ठ ( objective ) स्वरूप जे प्राप्त व्हायला पाहिजे ते प्राप्त होत नाही. त्यांच्या अनेक नाटकांच्या संदर्भात असे म्हणता येईल.
 १९१४ साली 'स्नेहलता' नावाच्या बंगाली तरुणीने आत्महत्त्या केल्याचे खळबळजनक वृत्त प्रकाशित झाल्याबरोबर मामांच्या प्रतिभेला धार आली आणि हुंड्यासारख्या दुष्ट चाली समाजातून नष्ट झाल्याच पाहिजेत हे त्यांना जाणवले. त्यातूनच त्यांचे नाटक लिहिले गेले ' हाच मुलाचा बाप.'
 वरेरकर विशिष्ट कालप्रवाहाबरोबरच वाहात असल्याचे दिसून येते. जसजसे कालप्रवाह बदलले तसतसे त्यांच्या नाटकांचे नाट्यविषयाचे वैविध्य जाणवते, त्याचे कारणदेखील हेच आहे. त्यातूनच त्यांच्या नाटकाचे स्वरूप, विविध घटना, प्रसंग वा समस्यांवरील वरेरकरांच्या प्रतिक्रिया, भाष्य वा त्यांच्यावर झालेले परिणाम अशा प्रकारे ठरलेले वाटते. ही आंदोलने, मग ती लहान असो, अथवा मोठी असोत, त्यावर ते लगेच नाटक लिहीत.