पान:अभिव्यक्ती.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्येष्ठ नाटककार मामा वरेरकर / २५


त्यांच्या नाट्यलेखनासंबंधीच्या आत्मकथनात याच गोष्टीचा स्वतः मामांनी निर्वाळा दिला आहे.
 "रंगभूमीच्या आणि नाट्यवाङमयाच्या क्षेत्रांत चैतन्य आणि त्याजबरोबर नावीन्य आणण्यासाठी देह, मन आणि बुद्धी यांबरोबर माझी अब्रू आणि अभिमानसुद्धा खर्ची पडलेला आहे."
मला वाटते, खरोखरच असे म्हणण्याचा अधिकार मामा वरेरकरांना आहे. ही त्यांचीच अधिकारवाणी बोलते.
 या पट्टीच्या नाटककाराने प्राप्त परिस्थितीला पचवून नाट्याच्या-रंगभूमीच्या अभिवृद्धीसाठी प्रगती आणि विकासासाठी अत्यंत धडाडीने प्रयत्न केले. स्वप्रज्ञेने प्रयोगपद्धतीत अभिनवता वा नावीन्यपूर्णता आणण्याच्या दिशेने प्रयत्न केले. त्यांच्या लेखणीतील या सामर्थ्याचा प्रत्यय त्यांनी नाट्यदृष्टीने केलेल्या नवनवीन प्रयोगांत दिसून येतो.
 आपल्या नाटकांना प्रायोगिक यश लाभावे आणि विशेष म्हणजे त्यातून अभिनयाला अवसर मिळावा ( तो त्यांनी मिळवून दिलाच !) अशाच धोरणातून त्यांनी नाट्यलेखन केलेले आहे. वरेरकरांनी अखंडित अर्धशतक नाट्यलेखन केले असले तरी एका विशिष्ट साच्यातून, ठरीवपणातून आपली नाटके लिहिली नाही. तोच तोपणा जो मराठीत वैपुल्याने रचना करणाऱ्या लेखकांत आढळणारा सामान्य दोष; त्यापासून मामा वरेरकर अलिप्त राहिले हे त्यांचे एक वैशिष्ट्य सांगता येईल. त्यांच्या नाटकांची डोळ्यांत भरणारी संख्या असूनही त्यांची बहुतेक नाटके ही नाट्य- दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण, एवढेच नव्हे तर तत्कालात पहिल्या पदाचा मान दिला गेला इतकी नावीन्यपूर्ण आणि प्रयोगक्षम ठरली आहेत.
 'कुंजविहारी' या त्यांच्या पहिल्या नाटकापासून तो 'भूमिकन्या सीता' या नाटकांपर्यंत नाटककार वरेरकरांच्या नाट्यप्रतिभेने अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत; अनेक प्रयोग करून पाहिले आहेत. या दृष्टीने पाहाता त्यांची उतारवयातील नाटके तर अधिक सफाईदार व यशस्वी झालेली आहेत.
 या संदर्भात कुंजविहारी, हाच मुलाचा बाप, सत्तेचे गुलाम, तुरुंगाच्या दारात, जिवाशिवाची भेट, संन्याशाचा संसार, उडती पाखरे, भूमिकन्या सीता इ. नाटकांची उल्लेखनीय नाटके म्हणून नोंद घेता येईल.
 'प्रगमनशील नाटककार' म्हणून फक्त वि. स. खांडेकरच वरेरकरांचा उल्लेख करतात. परंतु असे असले तरी त्यांच्या नाटकातील महत्त्वाची उणीव सांगावयाची झाल्यास, कलाबाह्य मूल्यांनाच महत्त्वाचे स्थान देऊ पाहाण्याची त्यांची धडपड ही सांगता येईल. मामा वरेरकरांचे कोणतेही नाटक हे हेतुपुरस्सरच लिहिलेले आहे, असे दिसून येईल. नाटक वा ललितकृती हेतुपुरस्सर असायलासुद्धा हरकत नाही.