पान:अभिव्यक्ती.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्येष्ठ नाटककार मामा वरेरकर / २७

 हे सगळं खरं असलं तरी मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात सातत्याने टिकून राहिलेला एकमेव नाटककार म्हणून मान द्यावयाचा झाल्यास तो वरेरकरांनाच द्यावा लागेल. मराठी नाट्य या वाङ्मयप्रकाराची सतत जोपासना करून त्यात जीव ओतण्याचे आणि त्याला तगविण्याचे महनीय कार्य मामा वरेरकरांनी केले आहे. त्यांच्या नाट्यविषयात समाजविघातक अशा विविध प्रवृत्तींचे चित्रण केलेले दिसून येते. त्यासाठी नाटकातील विविध व्यक्तीदेखील आलेल्या आहेत. या समाजात आढळणाऱ्या विविध प्रवृत्तींचे प्रातिनिधिक स्वरूप तयार करून उपहास, विनोद, विसंगती यांच्या सहकार्याने ते कथानक खुलवावयाचे हा वरेरकरांचा धर्मच होता. काळाबरोबर निर्माण होणारे नवे नवे प्रश्न, स्वतःला अभिप्रेत असलेली चित्रणे आणि सुधारणेस अनुकूल अशा प्रवृत्तींचा आढळ वरेरकरांच्या नाटकात दिसतो. कित्येक ठिकाणी जुन्या परंपरेला त्यांनी फेटाळून नवीन नवीन तंत्रांचा अवलंब आपल्या नाटका- तून केल्याचे दिसून येईल. वरेरकरांच्या पौराणिक, सामाजिक, ऐतिहासिक नाटकांत- देखील याच वृत्तीची जाणीव होते.
 जागृत स्त्रीचे दर्शन वरेरकरांना आपल्या नाटकांतून घडवावयाचे होते. मग हे साधताना त्यांच्या या मानसकन्या ( उदा :- बिजली, मंदा, चंदा इ. ) भडक चित्रित केल्या गेल्या. अवास्तव आणि आत्यंतिक गडद अशी ही स्त्री पात्रांची चित्रणे झाली आहेत. मात्र त्यांतूनसुद्धा वरेरकरांची प्रतिपाद्याच्याच प्रतिपादनाची धडपड स्पष्टपणे जाणवते. नवीन नवीन तंत्रांच्या वापराचा ( काहीसा अट्टाहासाने ) हव्यास, शिवाय अस्पृश्यतानिवारण, दारूबंदी, स्त्रीची कुचंबणा इत्यादी समस्यांवरील वरेरकरांची सुधारकी वृत्ती ह्या गोष्टी लक्षात घेतल्या म्हणजे वरेरकरांची ही नाट्यलेखनाची कला मुख्यतः समाजाभिमुख असल्याचे लक्षात येते. यातूनच प्रचारकी थाटाचा अभिनिवेशदेखील प्रकट झालेला आहे.
 यापेक्षादेखील वरेरकरांचे आगळेपण आणखी एका गोष्टीमुळे लक्षात येते. ती म्हणजे अनुकरणाची प्रवृत्ती त्यांच्यात अजिबात नव्हती. फार तर त्यामुळेच गडकऱ्यांची भावोत्कटता व प्रतिभेचे उदात्तत्व, गांभीर्य वरेरकरात येऊ शकले नाही. त्यांचा तो मनोधर्मच नव्हता. तथापि वैचारिक संघर्ष, सामाजिक प्रश्न वा समस्यांचे कौशल्यपूर्ण निवेदन आकर्षक, साधे परंतु खटकेबाज संवाद, प्रतिभेची चिर- संस्कारक्षमता या व अशा अनेक वैशिष्ट्यांनी त्यांची नाटके सिद्ध झालेली आहेत. मामा वरेरकरांनी स्वतःच आपल्या लक्षणीय व अखंड कर्तृत्वाने मराठी नाट्य व रंगभूमीवर स्वतःच आपले 'अढळपद ' सिद्ध केले आहे. वाङमयीन त्याबरोबरच ऐतिहासिक महत्त्व वरेरकरांना मराठी नाटक व रंगभूमीच्या इतिहासात देणे अपरिहार्य आहे.
 बहुशः मराठीतील लेखक हे आपल्या वयाच्या चाळिशीनंतर संपतात, किमान- पक्षी त्यांच्या लेखनात नावीन्य तरी उरत नाही. खऱ्या अर्थाने लेखनाचा भर ओसरलेला