पान:अभिव्यक्ती.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४/ अभिव्यक्ती


वाङमयप्रकाराला वा मराठी रंगभूमीला ( विशिष्ट अर्थाने ) कोणत्या वाबतीत समृद्ध केले? पण हा प्रश्न जरी अल्पकाळ बाजूला ठेवला आणि त्यांच्या नाटकांचा नुसता अभ्यास केला तरी मराठी नाट्यवाङमयाचा गेल्या ५० वर्षांचा इतिहास अगदी सहज लक्षात येऊ शकेल.
 मराठी साहित्यात वरेरकर हेच असे एकमेव नाटककार होते की, ज्यांनी कोल्हटकर, गडकरी, खाडिलकर यांच्यापासून जे नाट्यलेखन केले ते अगदी आजपर्यंतच्या नाटककारांच्या पिढीपर्यंत ! आपल्या स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी त्यांनी साहजिकच मराठी नाट्यवाङमयाचा विकास कसकसा होत गेला हे न्याहाळलेले असणार! आपल्या नाट्यलेखनाने प्रदीर्घ कालखंड व्यापणाऱ्या मामा वरेरकरांनी मराठी नाट्यवाङमय आणि रंगभूमी यांना साज चढविण्याच्या दृष्टीने हातभार लावलेला आहे. त्यांच्या या थोर कर्तृत्वावर आपले लक्ष केंद्रित करावयाचा प्रपंच प्रस्तुत ठिकाणी केलेला आहे.
 मराठी नाट्यसृष्टीच्या पडत्या काळात मराठी रंगभूमीला आपल्या पूर्ववत वैभवापासून परावृत्त होऊ न देण्याचा प्रयत्न ज्या अनेकांनी केला त्यात वरेरकरांचे स्थान निश्चितपणे महत्त्वाचे आहे. मराठी नाटक आणि रंगभूमीला सावरून धरण्याची मननीय कामगिरी त्यांनी केलेली आहे.
 हे श्रेय वरेरकरांना देताना त्यांच्या ठिकाणी प्रथमपासून मराठी नाट्य व रंगभूमीविषयी असणारी निष्ठा विशेषत्वाने लक्षात येते. आणि याच विशिष्ट ओढीने, निष्ठेने वरेरकरांनी नाट्य-रंगभूमीची सेवा केली आहे.
 वरेरकरांच्या नाटकांचे मूल्यमापन करीत असताना अन्य सुप्रसिद्ध नाटक- कारांशी ( देवल, खाडिलकर, गडकरी ) तुलना केली असता त्यांच्या नाटकात कितीतरी उणीवा राहून गेल्याचे लक्षात येते. त्यांच्या दोषाची जाणीव होऊन तुलनात्मक दृष्ट्या त्यांची नाटके फिक्कीही वाटू लागतात. त्यांत कलात्मक जाणिवेचा (artistic vision ) अभावही जाणवतो. हे स्वीकारूनदेखील स्वतंत्रपणे केवळ वरेरकरांच्याच नाटकाचा विचार केला; व त्यांच्या स्वतःच्या नाट्यविचाराकडे पाहिल्यास या बाबतीतील त्यांचे वेगळेपण लक्षात आल्याशिवाय राहाणार नाही.
 वरेरकरांना नाटकांची नुसती आवड होती असे न म्हणता नाट्यवाङमयाकडे त्यांचा जन्मजात ओढा होता. म्हणून मामा वरेरकर हे हाडाचे नाटककार होते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. केवळ नाट्यलेखनासाठी, मराठी रंगभूमीसाठी वरेरकरांनी पोस्टातील नोकरी सोडून आपले जीवनसर्वस्व मराठी रंगभूमीला अर्पण केले. याच एका ध्येयाने प्रेरित होऊन परिस्थितीची तमा न बाळगता अंगिकारलेले कार्य पार पाडण्यासाठी मामांनी आयुष्यभर धडपड केली. 'माझा नाटकी संसार' या