पान:अभिव्यक्ती.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाच


मराठीतील ज्येष्ठ नाटककार मामा वरेरकर

 मराठी साहित्यक्षेत्रात प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते ती म्हणजे लेखक, कलावंतांच्या हयातीत त्यांच्या गुणांचा यथोचित गौरव केला जात नाही. उदाहरणार्थ, केशवसुतांच्या हयातीत त्यांच्या कवितेची, क्रांतिकारकत्वाची ओळख पटलेली होती, असे म्हणता येत नाही. मराठी विनोदवाङमयात मानाचे स्थान असलेले चि. वि. जोशी यांच्या संदर्भातही नेमके हेच घडले. 'निदान माझ्या वाङमयसेवेकडे तरी पाहा' असे त्यांना स्वतःच सांगण्याची पाळी आली.
 या संदर्भातच मला कै. मामा वरेरकरांचा उल्लेख करावासा वाटतो. मामा वरेरकरांनी केलेली मराठी वाङमय प्रकारांपैकी 'नाटक या क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेतली तरी त्याचे एक वेगळे वैशिष्ट्य लक्षात आल्याशिवाय राहात नाही. परंतु त्यांच्या या विपुल नाट्यसंभाराचे, नाट्यलेखनाचे खऱ्या अर्थाने परिशीलन झाले असे म्हणता येणार नाही. नुसत्या त्यांच्या नाटकाच्या संख्येचा जरी आपण विचार केला तरी त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या जिज्ञासा वृत्तीची साक्ष पटणे अवघड नाही. प्रत्येक वाङमयेतिहासकाराला निदान त्यांची दखल घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. साहित्य प्रांतात स्वतःचे स्थान निर्माण करणे ही गोष्ट सहजासहजी शक्य होणारी नसते.
या दृष्टीने जर मामा वरेरकरांच्या केवळ नाट्यवाङमयाचा विचार केला तर मामांची साहित्यसेवा बरीच दांडगी आणि जोरकस आहे असे आपणास निश्चितप म्हणावे लागते. मराठी नाट्यक्षेत्रात आणि मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात एक प्रदीर्घ असा कालखंड मामांनी व्यापलेला आहे. साधारणपणे १९०५ ते १९५७ पर्यंत म्हणजे अर्धशतकापेक्षाही जास्तच काळ आपले लेखन सातत्याने त्यांनी केले.
 सुदैवाने दीर्घायुष्य लाभलेल्या या नाटककाराच्या नाटकांचा विचार करीत असताना एक गोष्ट विशेषत्वाने लक्षात येते. ती म्हणजे वरेरकरांनी नाटक या