पान:अभिव्यक्ती.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०/ अभिव्यक्ती


 कोल्हटकर उदयाला आले तो काल केवळ मराठी रंगभूमीचाच नव्हे तर महा राष्ट्रीय समाजाचा संक्रमण काल होता. त्यावेळी महाराष्ट्राचे वैचारिक जीवन दुभंगलेले होते. साधारणपणे १९०१ ते १९२१ या कालखंडात राजकीय व सामाजिक या दोन्हीही स्वरूपाच्या चळवळी झाल्या होत्या (वंगभंग, असहकार, मद्यपाननिषेध, स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, अस्पृश्योद्धार (नव्याने सुरू झाली) इत्यादी). आपली नाटके लिहिताना कोल्हटकरांच्या समोर सामाजिक प्रश्न निश्चितच होते. त्यावर नाटके लिहिली जावीत असेही त्यांना वाटे. त्या दिशेने त्यांनी प्रयत्न केले पण त्यांचा खरा ओढां तिकडे नव्हता. प्रतिपाद्य विषयाबद्दल फारशी आंच वा जिव्हाळा सापेक्षतः नसतानासुद्धा नाटकातून सामाजिक समस्या मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र या विषयातील गांभीर्य त्यांची प्रतिभा ओळखू शकली नाही.
 प्रमुख व सामाजिक समस्येच्या आश्रयाने अनेक समस्या त्यांनी आपल्या नाटकांतून चचिलेल्या आहेत. या संदर्भात 'संगीत मतिविकार' चे उदाहरण घेता येईल. या नाटकात विधवा पुनर्विवाहाचा प्रश्न आहे, विधवेशी पुनर्विवाह न करिता अल्पवयस्क कुमारिकेशी विवाह केल्यामुळे निर्माण झालेला विषमविवाहाचा प्रश्न आहे, केशवपनाचा, भ्रूणहत्येचा, ग्रामण्याचा इत्यादी अनेक प्रश्न ओढूनताणून आणले गेले आहेत.
 'लग्न' हे युद्धासारखे असल्यामुळे विधुरविवाह घडवून आणणारा हा मुलगा 'वीर' ठरविला आहे. 'मिळमिळीत सौभाग्यापेक्षा झळझळीत वैधव्य बरे,' असे मानणाऱ्या 'सरस्वती'च्या आणि 'पुरुषदेखील पत्नीच्या पश्चात पवित्र राहू शकतात अशी बढाई मारणाऱ्या' 'विहार'च्या मनात घडवून आणलेला फरक ‘मतिविकार' मध्ये दर्शविला आहे.
 'मतिविकार हे कोल्हटकरांचे पहिले शुद्ध सामाजिक नाटक प्रा. ना. बा. पराडकर यांचे हे मत अग्राह्य वाटते, उलट प्रा. वा. ल. कुलकर्णी यांचा प्रस्तुत नाटकावरील विचार ग्राह्य वाटतो. 'लुटुपुटीच्या कपटनाट्याच्या मदतीने हे प्रश्न निर्मिले व सोडविले आहेत. त्यामुळे त्या प्रश्नांमध्ये सामावलेले स्वयंभू जीवननाट्य नाटककार ह्या दृष्टीने कोल्हटकरांच्या बिलकूल लक्षात आले नव्हते असेच म्हणावेसे वाटते."
 कोल्हटकरांचे ठायी समस्या चित्रित करण्याची हौस होती असे दिसते, पण त्या सामाजिक समस्यांची अंगभूत बाजू तिला जन्म देणारे समाजजीवन वगळून ते चित्रित करतात. वास्तवासंबंधीची सूक्ष्म जाणीव त्यांना नव्हती. मनावर संस्कार

 ५. श्रीपाद कृष्ण : वाङमयदर्शन : प्रा. वा. ल. कुलकर्णी (पृ.६०)
 ६. नाटककार कोल्हटकर : प्रा. ना. बा. पराडकर (पृष्ठ ३५)
 ७. श्रीपाद कृष्ण : वाङमयदर्शन : प्रा. वा. ल. कुलकर्णी (पृष्ठ ६०)