पान:अभिव्यक्ती.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री. कृ. कोल्हटकरांच्या नाटकातील सामाजिकता/१९


तून जीवनाधारभूत अशा काही तत्त्वांचे संसूचन जेव्हा नाटककार करू लागतो तेव्हा त्यांच्या कलेला एक प्रकारे उदात्त सौंदर्य लाभते. मात्र हे तत्त्वसंसूचन वैशिष्ट्यपूर्ण चैतन्यमयी भूमिकांच्या द्वारा झाले पाहिजे.' कुठेही चैतन्यमय भूमिकांच्या स्वभावज कर्मामधून मानवी जीवनात प्रत्ययास येणाऱ्या सामाजिकाचे वास्तवदर्शन कोल्हटकर घडवीत नाहीत.
याचा अर्थ मराठी नाट्यसमीक्षकांनी सामाजिक नाटकांवरील तात्त्विक विचार ( theory ) बरोबर मांडला; पण त्यांनी मराठी नाटकातील. घेतलेली उदा- हरणे ( 'शारदा' नाटकाचा अपवाद वगळता ) बरोबर नव्हती. अस्सल सामाजिक नाटकांची मराठीत उणीव आहे हेच येथे स्पष्ट होते.

वैचित्र्य' सौंदर्यात्मा
 वैचित्याला कोल्हटकर सौंदर्यात्मा मानतात त्यामुळे त्यांच्या प्रतिभेला रहस्यमयता, कल्पना-वैचित्याशिवाय रससिद्धी अशक्य वाटली. एकाचवेळी त्यांना नाटकात कपटनाट्य आणि समाजसुधारणेबाबतचा अभिप्राय आणि आपल्या तल्लख कल्पकतेचा शाब्दिक विलास ठसठशीतपणे व्यक्त व्हावा अशी व्यवस्था अभिप्रेत असते. यासाठी संभाषणाची, कारस्थानांची योजना करावी लागते. ती नाटकातील विचारसंघर्षांवर प्रकाश टाकणारी वा सामाजिक चालीरीतींचा किंवा आचारविचारांचा ऊहापोह करणारी नसतात. त्यामुळे हे सारे लादले जाऊन त्यांच्या नाटकाची प्रकृती बिघडते. यातले कोणतेच रूप शेवटी शिल्लक राहात नाही. " The essence of drama is crisis " या 'ऑर्चर'च्या किंवा “Every drama must be an artistic presentation of a conflict " या शॉ'च्या विधानातील सत्य कोल्हटकरांच्या नाटकांत कुठेही प्रत्ययाला येत नाही.

कोल्हटकरांच्या नाटकांचे विषय
 कोल्हटकरांच्या नाटकांचे विषय हे स्वतः त्यांनी किंवा त्यांच्या टीकाकारांनी सांगून ठेवलेत म्हणून जाणवतात. अन्यथा त्याची फारशी जाणीव होत नाही. वीर- तनय (विधुरविवाह), मूकनायक (मद्यपाननिषेध), गुप्तमंजूष (स्त्रीशिक्षण), संगीत मतिविकार (विधवाविवाह), प्रेमशोधन (विषमविवाह), संगीत वधूपरीक्षा (अनुलोमविवाह), परिवर्तन (स्त्रियांचे समान हक्क), जन्मरहस्य (प्रतिलोमविवाह) असे स्थूलमानाने सांगता येतील. जवळ जवळ त्यांच्या सर्वच नाटकांतील विषय सामाजिक समस्या असल्याचे दर्शविता येत असले तरी कोल्हटकरांची वाङमयसृष्टी कल्पनारम्यतेचे कवच फोडून कधीच बाहेर पडू शकत नव्हती. त्यांची विश्लेषक शक्ती याला कारण म्हणा किंवा अन्य कोणत्याही कारणाने त्यांना समाजजीवनांशी व्यक्तीच्या सुखदुःखाशी एकरूप होता आले नाही.