पान:अभिव्यक्ती.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री. कृ. कोल्हटकरांच्या नाटकातील सामाजिकता

म्हणता येत नाही. नाट्यक्षेत्रात पदार्पण करीत असताना त्यांना आकर्षण आहे ते पारशी रंगभूमीचे - तिकडेच त्यांची प्रवृत्ती वेधली जाते.
 वस्तुतः १९०० पर्यंतच्या मराठी रंगभूमीचा व नाट्यवाङमयाचा विचार केला असता, असे आढळते की अनेक दृष्टीने अत्यंत समर्थ असा पाया कै. अण्णासाहेब किर्लोस्कर, गो. व. देवल यांनी आयताच घालून दिलेला होता; पण ही देवल - किर्लोस्करांची परंपरा कोल्हटकरांना टिकवतासुद्धा आली नाही. समृद्ध अशा या मराठी कलाशुद्ध नाट्यपरंपरेला तडा देऊन कोल्हटकरांनी पारशी नाटक मंडळींचे अनुकरण केले. साहजिकच यामुळे त्यांना 'किर्लोस्कर नाटक मंडळीची नाटके पार फिक्की वाटत असत' किंवा 'देवलांची नाट्यसंवादातून सहजपणे उमललेली पदे कलापूर्ण वाटत नाहीत'; 'किर्लोस्करांच्या शाकुंतल' व सौभद्र' नाटकांतील पदे गद्यसदृश वाटतात; आणि मग ते 'वीरतनयाची ढाल"या टीकात्मक लेखात 'ती गद्यात अवतरली असती तर अधिक बरे झाले असते' असे लिहितात. 'कला म्हणजे 'कल्पनेचा विलास' ही त्यांची प्रामाणिक समजूत असल्यामुळे त्यांना 'देवला'त कलेचा भाग कमी वाटणे स्वाभाविक आहे. नाट्याला मारक अशा ज्या परंपरा त्या कटाक्षाने अण्णासाहेब किर्लोस्कर, देवलांनी टाळल्या. पण कोल्हटकरांनी मात्र नेमक्या उचलल्या. कोल्हटकरांच्या नाटकांत कृत्रिमता हा गुण सर्वव्यापी आहे. त्यांची भाषाशैली कृत्रिम आहे, कथानके मुद्दाम जुळवून आणलेल्या, क्लिष्ट कल्पना- निर्मित घटनांनी भरलेली आहेत. विनोदउपहासादी नानाप्रकारच्या बौद्धिक कसरती व कोट्यांनी भरलेली म्हणून कृत्रिम आहे असे आहे ! कोल्हटकरांचे कृत्रिमतेचे जग !
पारशी रंगभूमीचे आकर्षण
 कोल्हटकरांना आवड आहे ती 'हामान', 'गुलबकावली', 'खुदादाद' या पारशी नाटक मंडळयांकडून होणाऱ्या नाटकांची. त्यांच्या रहस्यप्रधान संविधानकाची. ही त्यांची आवड नष्ट कधीच झाली नाही.
 पारशी नाटक मंडळयांकडून होणारी 'हामान', 'गुलबकावली', 'चतरा- बकावली' ही नाटके माझ्या फार आवडीची होती" ही त्यांनी स्वतःच आत्मवृत्तात दिलेली कबुली प्रस्तुत संदर्भात लक्षणीय आहे. शिवाय कोल्हटकरांचा नाटका- विषयीचा उपयुक्ततावाद्याचा दृष्टिकोन आहे. त्यांनी नाटकाला साधन म्हणून मनोरंजनासाठी वापरलेले आहे. ज्या नाटककाराच्या मूळ हेतूमध्येच संगती नसते तेव्हा जन्मणाऱ्या नाटकात तर ती शोधूनही सापडणे कठीण ! वीरतनय (१८९६) या त्यांच्या पहिल्याच नाटकात क्षुल्लक, लुटुपुटीच्या, रहस्यप्रधान ‘गोष्टींचे' नाटक बनविण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो. वीरतनयाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत कोल्हटकरांनी म्हटले आहे, या नाटकापासून फारसा उपयोग जरी
अ...२