पान:अभिव्यक्ती.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६ / अभिव्यक्ती
 सामाजिक समस्यांच्या दर्शनाबरोबरच त्याला जन्म घालणारा जो समाज त्याचे जे विशिष्ट वास्तव असते त्याचेही दर्शन त्याला घडवावे लागते. विशिष्ट समाजातील समस्या, प्रमेय, संकेत, नीति-अनीतीच्या कल्पना, स्वभावतःच उद्भवणारे पेचप्रसंग ह्यांतून जन्मलेले नाट्य, त्या कलावंताच्या वा नाटककाराच्या अनुभूतीचा अटळ घटक बनून सामाजिक नाटकात साकार होत असते. कलाकृतीतून शोधलेल्या अनुभवापासून अलग, स्वतंत्र वा अनुभवनिरपेक्ष असे स्थान त्याला नसते.
कोल्हटकरांची नाटके : कृत्रिमतेचे जग
 कोल्हटकरांनी एकूण १२ नाटके लिहिली. १८९६ ते १९२९ हा त्यांचा नाट्य- लेखनाचा काल. कोल्हटकरांची ही नाटके वाचून मनावर परिणाम होतो तो असा की, या नाटकांना खऱ्या अर्थाने कलाकृतीपण लाभत नाही. एका अर्थाने आज त्यांच्या नाटकांना केवळ ऐतिहासिक मूल्यच उरलेले आहे असे वाटते. ' कृत्रिमतेचे युग या सार्थ शीर्षकाखाली श्री. ना. बनहट्टींनी आपल्या 'मराठी नाट्यकला आणि नाट्यवाङमय या व्याख्यानग्रंथात कोल्हटकरांच्या नाटकांचा विचार केलेला आहे.
 कोल्हटकरांच्या प्रतिभेत भावनेपेक्षा बुद्धी आणि कल्पना या शक्तीच अधिक प्रबळ होत्या' हा वि. स. खांडेकरांचा अभिप्राय आहे. त्यांच्या नाटकांची कथानके बौद्धिक कसरतीचे खेळ वाटतात. या विलक्षण गुंतागुंतीच्या रहस्यमयी कथानकावर आपले लक्ष एवढे केंद्रित होते की त्यामुळे ही कथानकाची गुंतागुंत, बेगडी रहस्यमयता, कल्पनाचमत्कृती त्यांच्या प्रवळ प्रवृत्ती ठरून त्यांत दडलेला सामाजिक सुधारणावादी आशय क्वचितच आपल्या लक्षात येतो.
 याचा अर्थ श्रीपाद कृष्णांच्या प्रतिभेत मुळातच हा नाट्यानुकूल धर्म नव्हता असे लागेल. कलाबाह्य आकर्षणामुळेच त्यातील पायमल्ली झाली आहे. ते गुदमरले आहे. नाट्याच्या प्रकृतीविषयी त्यांचे विलक्षण अपसमज,. चुकीच्या कल्पना, त्यांना वाटणारे एक वेगळेच आकर्षण यामुळे त्यांच्या नाटकाला. कलाविहीन रूप प्राप्त झाले आहे.
 कोल्हटकरांनी आपल्या नाटकाला लिहिलेल्या प्रस्तावना, त्यांचे आत्मवृत्त (उपरिनिर्दिष्ट विचारांना पूरक म्हणून) इत्यादींमधील उल्लेख एका मर्यादेपर्यंत: प्रस्तुत ठिकाणी करणे इष्ट ठरेल. कोल्हटकरांनी आपल्या नाट्यलेखनाला प्रारंभ करण्यापूर्वी नाटकावर परीक्षणे लिहून नाटकाच्या संदर्भात गंभीर विचार करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि त्यांची नाट्याभिरुची विशेष प्रगल्भ होती असे त्यावरून
१. मराठी नाट्यकला आणि नाटयवाङमय : श्री. ना. बनहट्टी (पृष्ठ १२३)