पान:अभिव्यक्ती.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४ / अभिव्यक्ती

ग्रांथिक स्वरूपाची भाषा व संवादच त्यात येत. अपेक्षित असे वेगळे रूप या बुकिश नाटकांतून रंगभूमीला मिळू शकले नाही. मात्र काही बाबतीत (उदा.:- नाटकाचे बाह्यांग) विशेष लक्षणीय बदल झाला. प्रयोग सादर करण्याच्या पद्धतीत विलक्षण बदल झाला. वास्तववादामुळे रंगमंच व आकार आवश्यक व निश्चित झाले. सुशिक्षित नटवर्गाचीच निवड केली जाऊ लागली. कारण अभिनय सूक्ष्म होण्यासाठी नटालाही समज असणे आवश्यक होते. ड्रॉप सीन्स (drop scenes) येऊ लागले. आढळू लागली. एकूण नाट्याभिरुचीत व नाट्याविषयीच्या समजात बदल झाला. पण एवढे असूनही कलात्मक, उच्च पातळी रंगभूमीला ह्या बुकिश नाटकांमुळे प्राप्त होऊ शकली नाही. मात्र या भाषांतरित नाटकांच्या परिचयांमुळे नेपथ्यरचना, बांधेसूदरचना असलेली नाटके लोकांना आवडू लागली. नवा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला.
खरा शेक्सपिअर आकलन झालाच नाही
 शेक्सपिअरची नाटके खऱ्या अर्थाने अनुवादकांच्या लक्षात आलेली नाहीत. वरवरचे बाह्य रूपच त्यांना जाणवले. इल्युजन ( illusion ) वा डिल्युजन ( dellusion ) दाखविणे म्हणजे शेक्सपिअर असा चुकीचा समज झाला. वस्तुतः त्याचे खरे सामर्थ्य भाषा व व्यक्तिचित्रणातच होते. नेमके हेच लक्षात घेतले नाही. शेक्सपिअरची प्रतिमा ( image ) ही मनोवस्था साकार करण्यासाठी येते तर आपल्याकडे अलंकरणाच्या सोसाचीच जाणीव होते. मराठी नाटककारांनी शेक्सपिअरची भाषा उचलली, पण त्याच्या काव्यात्मतेला, भावोत्कटतेला अलंकर- णाचेच रूप प्राप्त करून दिले. आमच्या नाटककारांचे रंगभूमीविषयीचे तोकडे ज्ञान हेदेखील शेक्सपिअरची भाषांतरे थिटी होण्याचे कारण निर्देशिता येईल. मराठी नाटककारांच्या पाठीशी खरा शेक्सपिअर उभा नाही हेच खरे.
 मराठी नाटकांच्या प्रारंभीच्या स्वरूपांबाबत शेवटी हेच म्हणावे लागेल की, जोपर्यंत समर्थ असे नाट्य रंगभूमीवर येत नाही तोपर्यंत रंगभूमीचा विकास झाला असे म्हणता येत नाही.' म्हणून प्रारंभकाली मराठी नाट्यवाङमय सुमार दर्जाचेच होते असे म्हणावे लागते.