पान:अभिव्यक्ती.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२/ अभिव्यक्ती  तुकड्यांनी जोडलेली अशी ही रंगभूमी होती. त्यांचा साचा एकसंध नव्हता. आणि मुख्य ध्येय होते करमणुकीचे.  प्रो. वा. ल. कुलकर्णी संपादित 'समीक्षा'त के. नारायण काळे यांनी तमाशा व विष्णुदास भावे ही दोन टोके होती असे म्हटले आहे. वस्तुतः दशावतारी खेळ आणि तमाशा यांत मूलतः भेद नाहीच. फक्त विषयात भिन्नता आहे. समान साधनेच वापरली जात. विषयभेद वगळल्यास अभिव्यक्तीच्या पद्धतीतही साम्यच आढळते.
भाषांतरित नाट्यवाङमयाचे दालन  प्रारंभीचे हे नाट्य भडक व कृत्रिम नाट्याचा आविष्कार करी; त्यांना अभिनय वा अभिव्यक्तीतील सूक्ष्मपण आवडत नसे. ढोवळ अनुभव हा ढोबळ अभिनय माध्यमातूनच व्यक्त केला जात असे. हाच प्रवाह सुरुवातीच्या वीस वर्षांत रूढ होता. यानंतर महाराष्ट्रातील सुशिक्षित पिढीने संस्कृत व इंग्रजी वाङमयांतील नाटकांची भाषांतरे व रूपांतरे सादर करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या भाषांतरित नाट्यवाङमयाचे हे दालन मराठी नाट्य व रंगभूमीच्या विकासाला फारसे पोषक ठरू शकले नाही. संस्कृतसारखेच बोजड, गंभीर व अलंकृत भाषांतरित नाटकांचे स्वरूप दृश्य माध्यमाला फारसे आवश्यक नव्हते. बुकिश नाटकातून अभिनयाला फारसा वाव मिळू शकला नाही अशी ही नाट्यनिर्मिती झाली. तात्पर्य, मराठी नाटकाच्या क्षेत्रात या वेळी दोन प्रवाह रूढ होते : (१) डोळसपणे लोकनाट्यपरंपरा सादर करणाऱ्या भावेदिकांची; (२) सुशिक्षितांची बुकिश नाटके.
१८२० नंतर झालेला कायापालट  विष्णुदास भाव्यांची रंगभूमी अयशस्वी होऊन एकूण मराठी रंगभूमीत ती टिकाव धरू शकली नाही, टिकाऊ ठरलीही नाही. मात्र एवढे खरे की, तत्पूर्वीच्या खास मराठी परंपरेतील नटांची भाषा हीच त्या व्यक्तीची व्यवहारातील बोलभाषा होती. त्यात एक प्रकारे उत्स्फूर्तता होती, आणि हाच व्यावहारिक भाषेतील जोम जसा भाव्यांच्या नाटकाला प्राप्त झाला तसा जिवंतपणा बुकिश नाटकांना प्राप्त होऊ शकला नाही.
पाश्चात्यांच्या मराठी नाटकावरील प्रभाव  मराठी नाटकावरील पाश्चात्यांच्या नाटकांच्या प्रभावाचे स्वरूप लक्षात घेत असताना मुख्यतः शेक्सपिअर, मोलिअर, इब्सेन आदींचा उल्लेख करावा लागेल. शेक्सपिअरच्या नाटकांचे सुमारे २० अनुवाद मराठीत झाले. 'बुकिश' नाटकांची परंपरा स्वतंत्रच अस्तित्वात आली एवढेच नव्हे तर एकेका नाटकांचे अनेकांनी अनुवाद केलेले आढळतात. गोल्डस्मिथ, ऑक्सरवाईल्ड, गॉल्सवर्दी, बॅरी, प्रिस्टली यांशिवाय ब्योर्नसन, मेटलिंग, इब्सेन आणि अप्रत्यक्षपणे लुइजी पिरांदलो यांचेही अनुवाद झाले आहेत. परंतु यांचा केवळ नामोल्लेख करून पुढे जाणे आवश्यक आहे.