पान:अभिवादन (Abhivadan).pdf/82

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


श्री. ग. त्र्यं. माडखोलकर । ७९


लोक विसरून जात. माडखोलकर असे कुणाला विसरता येणारे नाहीत. आपल्या प्रदीर्घ वृत्तपत्रीय जीवनात त्यांनी जखमी केलेली खूप माणसे आहेत. हे त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य आहे, जे सतत माडखोलकरांच्याविषयी प्रतिकूल बोलण्यास लोकांना उद्युक्त करते. म्हणून माडखोलकर पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ या दोन्ही ठिकाणी परके. ब्राह्मण आणि मराठे यांच्यातही परके. सर्व राजकीय पक्षांनाही परके राहिलेले आहेत. कोणताच राजकीय पक्ष त्यांच्याविषयी उचंबळून बोलणार नाही.
 माडखोलकरांनी आपल्या या कंगोरेदारपणाची मोठी किंमत मोजलेली आहे. गांधीजींच्यावरील त्यांच्या लिखाणाचा परिणाम पुढे कैक वर्षांनी 'तरुण भारत' जाळण्यात झाला. माडखोलकरांच्या या वागणुकीमुळे इतर काही नसले तरी एक गोष्ट निश्चित आहे की, इतर सारी मंडळी राजमान्य झाली. पन्नाशीतील साहित्यिकांच्यापर्यंत पदव्या आल्या. त्यांचे समकालीन पद्मभूषण झाले. माडखोलकरांना तो योग येण्याचा संभव नाही, इतके त्यांच्याविषयी वातावरण पक्के प्रतिकूल आहे.
 शिवाय माडखोलकर हे सततचे उद्योगी गृहस्थ. दैनिकाचा प्रचड व्याप सांभाळून त्यांचे वाचन व टीकात्मक लिखाण चालूच असते. त्यातून उरलेल्या वेळात कादंबऱ्या चालू असतात. राजकारणाच्या अंतर्गोटात त्यांचा वावर असतो. तिथे ओठ घट्ट मिटून त्यांनी अनेक गोष्टी टिपलेल्या असतात. माडखोलकरांना घट्ट ओठ मिटून वसण्याची सवय आहे. त्यांच्याजवळ आपले रहस्य मोकळे केले तर फुटणार नाही, अशी अनेकांना खात्री असते. मोठया विश्वासाने वाङमयीन, सामाजिक व राजकीय जीवनातील व्यक्तींनी आपले रहस्य त्यांच्याजवळ दिले. या असल्या प्रकारच्या माहितीचा फार मोठा साठा माडखोलकरांच्या जवळ आहे. पण देणायाने हे रहस्य या विश्वासाने स्वाधीन केलेले असते की, त्याचा गैरवापर केला जाणार नाही. माडखोलकरांनी आपल्या स्मृतीच्या कोशात दशकानुदशके ही रहस्ये जतन केली. त्यांचा अनाठायी गैरवापर कधी केला नाही. ज्या व्यक्तींची वर्मे त्यांना माहिती होती, त्यांच्याही विरोधात टीका-प्रतिटीकेला ते मधून मधून उभे राहिले. पण ज्ञात रहस्ये उघडी करून कंवरेखाली वार त्यांनी केला नाही.
 असा उद्योगी माणूस सर्वांना विपुलपणे गप्पा मारण्यासाठी उपलब्ध नसतो. म्हणून माडखोलकर निष्कारण वेळ खाणा-या माणसाला चटकन झटकून टाकतात. त्यांच्या वाचन, लेखन, विश्रांतीच्या वेळा ठरलेल्या आहेत. भलत्या वेळी आलेला माणूस त्यांना चालत नाही. कानांवर आख्यायिका अशी आहे की, ते घरी असूनही आपल्या ठराविक वेळेपेक्षा इतर वेळी लोकांना भेट देत नाहीत. हा सर्वसामान्यांच्या मते एक तुसडेपणाचा भाग असतो. उद्योगी माणसांना निष्कारण वेळ खाणारी