पान:अभिवादन (Abhivadan).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


७८ : अभिवादन



काय वाटते, या जाणिवेचा असतो. एखाद्याच्या विषयी आपल्याला असे वाटते की, तो अगदी आपला झाला आहे. एखाद्याविषयी आपल्याला असे वाटते की, हा जुना परिचित खरा आणि याचा आपला ऋणानुबंधही खरा, पण तो कुठे तरी परका आहे. माडखोलकरांच्या निकट सहवासातील मंडळींनाही ते काही प्रमाणात परकेच वाटत राहिले. श्री. शांताबाईंनी आपली साक्ष दिलेली नाही. जर दिली असती, तर त्यांनीही अशीच दिली असती.
 हे परकेपण माडखोलकरांच्यावर त्यांच्या परिस्थितीमुळे लादलेले आहे. त्यांचे मूळ घराणे गोव्याचे. आयुष्याचा पूर्वार्ध मुंबई, पुण्यात गेला. आणि पुढे ऐन पंचविशीपासून ते जे विदर्भात आले, ते आज पन्नास वर्षे विदर्भातच आहेत. विदर्भाच्या दृष्टीने माडखोलकर विदर्भाचे फार मोठे साहित्यसेवक, पत्रकार आणि विदर्भाच्या हिताच्या प्रत्येक प्रश्नावर विदर्भाची बाजू घेऊन भांडणारे म्हणजे आपले आहेत. पण, या आपलेपणात, हा खरा आपला नव्हे, हा पश्चिम महाराष्ट्राचा आहे, ही परकेपणाची जाणीव शिल्लकच आहे. ही जाणीव, संयुक्त महाराष्ट्राबाबत त्यांनी जी आग्रही भूमिका घेतली, त्यामुळे बळकट झालेली आहे. खरे म्हणजे महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षातही माडखोलकर कधी नव्हते. ते मंत्रिमंडळातही नव्हते आणि नाहीत. पण विदर्भात कमी जास्त काही घडले की, दोषारोप महाराष्ट्र राज्याच्या माथ्यावर ठेवला जातो. स्वाभाविकपणे, महाराष्ट्र राज्याला दोषी धरीत असताना, लोक माडखोलकरांनाही दोषी धरतातच. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ यांना एकत्र सांधणारा वलवान दुवा म्हणून माडखोलकर वागत राहिले. त्यामुळे विदर्भाच्या जनतेला- विदर्भातील संयुक्त महाराष्ट्रवाद्यांनाही, हा आपला नव्हे, हे जाणवतच असते.
 हाच प्रकार उलटया बाजूने पश्चिम महाराष्ट्राचा आहे. पश्चिम महाराष्ट्र त्यांना विदर्भाचा प्रतिनिधी समजतो. माडखोलकर वृत्तपत्रकार असल्यामुळे त्यांना अधून मधून काही लिहावेच लागते. वृत्तपत्रकारांच्या लेखणीत जसा भडकपणा असतो, तसा माडखोलकरांच्या जवळ नाही. त्यांना 'संदेशकार' कोल्हटकर किंवा आचार्य अत्रे या संपादकांच्या रांगेत कुणी बसवणार नाही. नाटकी, भडक, अतिरंजित अशी लेखणी त्यांनी वृत्तपत्राच्या क्षेत्रात सजविली नाही. त्यांचे वृत्तपत्रीय लिखाण पुरेसे थंड असते. पण या थंडपणात खोलवर जिव्हारी घाव घालण्याची शक्ती आहे. त्यामुळे माडखोलकर अशी जखम करून जातात, जी जन्मभर कधी वुजत नाही. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी त्यांनी जाहीर रीतीने असा प्रश्न विचारला की, " हे मराठी राज्य होणार का मराठा राज्य होणार ?" या प्रश्नाने झालेली जखम, आज बारा वर्षे झाली तरी, सतत चिघळती राहिली आहे. अत्र्यांचे शिव्याशाप, त्यांची आक्रस्ताळी भापा, त्यांनी दिलेली दूषणे काही दिवसांनी