पान:अभिवादन (Abhivadan).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


कै. कहाळेकर व रसचर्चा । ६१


तो सांगावासा वाटतो त्यांना कळलेला नसतो. आणि ज्यांना तो कळलेला असतो ते न सांगता गप्प बसतात, असे भगवद्गीतेत म्हटलेले आहे. कहाळेकर म्हणाले, हे तर फारच चांगले झाले. म्हणून ध्वनी काव्याचा आत्मा आहे हे वाक्य आपण नव्या पद्धतीने मांडू. ध्वनी काव्याचा काय आहे हे कुणालाच सांगता येणार नाही. कारण ज्यांना सांगता येईल त्यांना ते कळलेले नाही. अशा वेळी मी तुमच्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ? मी म्हटले, उत्तर देता येत नसेल तर गप्प बसावे. कहाळेकर महाराज म्हणाले, जागा अडचणीची आहे. मी जर गप्प बसलो तर ध्वनी काव्याचा काय अर्थ आहे ते मला माहीत असून मान्य आहे असे ठरेल. मी त्यांना विचारले, केवळ गप्प बसल्यामुळे विद्वान आणि जाणता कोण ठरतो हे तुम्हाला माहीत आहे काय ? कहाळेकर खळखळून हसले आणि म्हणाले, एका सुभाषिताच्या आधारे तुम्ही चक्क तोंडावर मला मूर्ख म्हणत आहात. मी त्यांना विचारले, तुम्ही तोंड उघडून बोलावे आणि शहाणे ठरावे ही संधी तुमच्यासमोर उघडी आहे; शिवाय केवळ गप्प बसावे आणि शहाणे ठरावे हीही संधी तुम्हाला मिळाली आहे. मग तुम्हाला तक्रार कशी करता येईल. महाराज म्हणाले, मी गप्प बसून मूर्खपणा कबूल करावा किंवा तोंड उघडून मूर्खपणा प्रकट करावा अशी तुमची इच्छा दिसते.
 मी सांगितले, तुम्ही फाटे फोडून विषय टाळू नका. मूळ मुद्द्यावर आपण वोलू. तुम्ही ध्वनीचा अर्थ काय मानता ? महाराज म्हणाले, जो कानाला ऐकू येतो त्याला आम्ही ध्वनी म्हणतो. आणि कानाला ऐक येणे हे काव्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्टय आहे, असे मला वाटत नाही. मी म्हटले, हे बरोबर नाही. ध्वनी हा शब्द या ठिकाणी आवाज या अर्थाचा नसून सूचित अर्थ असे ध्वनी शब्दाने अभिप्रेत आहे. कहाळेकर म्हणाले, ध्वनी म्हणजे सूचित अर्थ ही भूमिका तुमची समजायची की जोगांची ? मी चर्चेला आरंभ म्हणून म्हटले, ही भूमिका माझी आहे. जर ती जोगांचीही असेल तर तो योगायोग समजायला पाहिजे. महाराज म्हणाले, चला, निदान आता एक भूमिका स्वीकारून तुम्ही बोलत आहात. तेव्हा जोगांच्या नावाआड दडण्याची गरज नाही. आपण ज्या वेळी मला तहान लागली असे म्हणतो तेव्हा प्यायला पाणी हवे हा अर्थ सुचविला जातो. या ठिकाणी अर्थ सुचविला जातो म्हणून काव्य आहे असे तुम्ही म्हणाल काय ? मी म्हटले, नाही. पण यामुळे ध्वनी काव्याचा आत्मा नाही हे जोगांचे मत सिद्ध होते. कहाळेकर म्हणाले, चर्चेत जोगांना सतत खेचण्याची तुमची इच्छा दिसते. चूक ठरले तर जोग चूक ठरावेत आणि बरोबर ठरले तर तुमचे मत बरोबर ठरावे. तेच जोगांचेही मत आहे हा केवळ योगायोग असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?
 मी म्हटले, मी चूक ठरलो तरी हरकत नाही. ध्वनी म्हणजे सूचित अर्थ हे