पान:अभिवादन (Abhivadan).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


६० । अभिवादन



माणूस हा या कवितेचा विषय तिचा आत्मा आहे हे. तुम्हाला मान्य आहे का?
 मला रसचर्चा माहीत नसली तरी थोडी फार कविता कळत होती. तुतारी मागणारा माणूस हा केशवसुतांच्या तुतारीचा विषय आहे ही आपली चेष्टा चालू आहे इतके मला कळालेच. तेव्हा मी म्हटले, तुतारी मागणारा माणूस हा या कवितेचा विषय नाही. या कवितेत तुतारी ही वस्तू नव्हे. तो एक सांकेतिक शब्द आहे. कवीची इच्छा सर्व समाज खडबडून जागा करावा आणि बदलावा ही आहे. त्या क्रांतीचे साधन म्हणून तो तुतारी हा शब्द वापरीत आहे. म्हणून या ठिकाणी शब्दाचा सामान्य अर्थ समजायचा नाही. तर त्या शब्दाने अभिप्रेत असलेला संकेत समजायचा आहे. कहाळेकर म्हणाले, तुम्हाला कविता इतरांशी भांडण करण्याइतकी आवडते ही चांगली गोष्ट आहे. बऱ्यापैकी कवितेची समजही आहे. पण यामुळे मूळ मुद्दा बदलत नाही. मूळ मुद्दा असा आहे की, कवितेचा विषय हा काव्याचा आत्मा असू शकतो काय ? त्यांनी मला विचारले, एका म्हाताऱ्याचे तरुण मुलीशी लग्न ठरते हा नाटकाचा विषय असू शकतो काय ? मी म्हटले, देवलांच्या शारदा नाटकाचा तो विषय आहे. पण त्या विषयामुळे ते नाटक चांगले आहे, असे काही मी म्हणणार नाही. तेव्हा कहाळेकर म्हणाले, विषय हा काव्याचा आत्मा नसतो ही शंका तुमच्या मनात का येऊ नये ? मी म्हटले, अहो, ही शंका माझ्या मनात कशी येईल ? कारण जोगांनी तसे म्हटले. ते म्हणाले, म्हणजे तुम्ही आतापर्यंत जोगांचे मत सांगत होता. मला वाटले, ते तुमचे मत आहे. थोडा वेळ थांबून त्यांनी विचारले, बी. ए., एम्. ए. शिकलेल्या प्रत्येक माणसाने अभिनवकाव्यप्रकाश वाचलेला असतो. ते क्रमिक पुस्तक आहे. तेव्हा मीही ते वाचलेले असेल अशी शंका तुम्हाला का येऊ नये ? मी म्हणालो, तुम्ही जोगांचा अभिनवकाव्यप्रकाश वाचलेला नाही असे काही मी म्हटलेले नाही. ते म्हणाले, जर जोगांचे लिखाण वाचल्यानंतरसुद्धा ध्वनी हा काव्याचा आत्मा आहे, असे मी समजत असेल तर जोगांच्या विधानात मला काही तरी चूक दिसत असली पाहिजे. ती मला दिसणारी चूक कोणती असावी, याचा विचार करण्याची इच्छा तुम्हाला का होऊ नये ? मी म्हटले, बाकीचे सोडा, पण ध्वनी हा काव्याचा आत्मा आहे, असे तुम्हाला वाटते हे खरे आहे ना ? कहाळकर म्हणाले, खरे इतकेच आहे की, मी ध्वनीला काव्याचा आत्मा मानतो असे तुमचे मत बनले आहे.
 मी विचारले, मग ध्वनी हा काव्याचा आत्मा नाही असे तुम्हाला वाटते काय ? कहाळेकर म्हणाले, या प्रश्नाचे उत्तर देता येणे कठीण आहे. कारण तुम्ही काव्य कशाला म्हणता, आत्मा कशाला म्हणता, ध्वनी कशाला म्हणता हे कळल्याशिवाय याचे उत्तर देता येणार नाही. भगवद्गीता मी वाचलेली होती. मी म्हटले, अहो, आत्मा म्हणजे काय, हे कधीच कुणाला सांगता येणार नाही. कारण ज्यांना