पान:अभिवादन (Abhivadan).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


कै. कहालेकर व रसचर्चा


कै. भालचंद्र महाराज कहाळेकर यांच्या सहवासात माझ्या विविध विषयांवरील चिकित्सक चिंतनाला आरंभ झाला. त्यांच्याशी मी गेल्या२४ वर्षांत वेळोवेळी विविध विषयांवर विविध प्रकारच्या चर्चा केल्या. या चर्चापैकी संस्कृत रसव्यवस्थेवरील चर्चा काही प्रमाणात या लेखात नोंदविण्याचा विचार आहे. कहाळेकरांच्या बरोबर चर्चा करणे हे कठीणच काम असे. आपण कोणत्या विषयावर काय वाचलेले आहे हे ते सांगत नसत. किंबहुना, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करताना एखादा मुद्दा उपस्थित केला, तर तो मुद्दा कुठून घेतलेला आहे, हेही ते विचारीत नसत. होता होईतो माणसे बाजूला ठेवावीत आणि प्रश्नांवर चर्चा करावी, अशी त्यांची धडपड असे. आपण एखादा विषय विचारला तर तो भालचंद्र महाराजांनी नीट व्यवस्थित समजावून सांगावा अशी माझी इच्छा असे. संस्कृतमधील रसव्यवस्थेवर महाराजांशी मी सर्वप्रथम इ. स. १९५० साली बोलल्याचे आठवते. आणि या विषयावर त्यांच्याशीशेवटची चर्चा जून १९७४ ला झाली, असेही मला आठवते. या २४ वर्षांत कैक मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली. कैक विषयांवर त्यांनी आपली भूमिका काही प्रमाणात बदलून घेतली. माझ्याविपयी तर भूमिका बदलण्याचा प्रश्नच नव्हता. कारण माझी भूमिका क्रमाने या चर्चाच्या अनुरोधाने स्पष्ट होत गेलेली आहे.
 आज इतक्या वर्षांनंतर या चर्चाचा विचार करताना मला असे वाटते की, भरतनाटयशास्त्र आणि 'अभिनव भारती' हा आरंभी कहाळेकरांच्या अभ्यासाचा विषय नव्हता. मराठीत असलेल्या रसचर्चेखेरीज मूळ संस्कृत ग्रंथाकडे वळायचे म्हणजे आनंदवर्धनाचा ध्वन्यालोक आणि त्यावरील अभिनवगुप्ताची लोचन टीका त्यांनी विद्यार्थीदशेत पाहिलेली होती.याखेरीज प्राचीन परंपरेने अभ्यास करणा-या अभ्यासकांचे साहित्य दर्पण' आणि 'काव्य प्रकाश' या दोन ग्रंथांवर प्रेम असे. विश्वनाथापेक्षा मम्मट हा कहाळेकरांचा विशेष आवडता ग्रंथकार होता. मम्मट ओलांडून मूळ भरत