पान:अभिवादन (Abhivadan).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


५८ । अभिवादन



नाट्यशास्त्राकडे आपण गेले पाहिजे, असे त्या वेळी त्यांना वाटले नसावे. इ. स. १९५० साली कै. दि. के. वेडेकर यांचे लेख वाचताना आणि पुढे डॉ. बारलिंगे यांचे लेख वाचताना ते भरतनाट्यशास्त्राच्या मूळ संहितेकडे वळले असावेत. नेमका कोणता ग्रंथ त्यांनी कोणत्या वेळी वाचला असावा हे सांगणे कठीण आहे. पण आरंभी त्यांच्या बोलण्यात नेहमी मम्मट येत असे. पुढे ते वारंवार भरतनाट्यशास्त्राचा आणि अभिनवगुप्ताच्या टीकेचा आधार घेऊ लागले. अर्थात ही सगळी माझी अनुमाने आहेत. त्यांना तुम्ही अमुक ग्रंथ वाचलेला आहे काय, असे विचारण्याचा प्रश्न संभवत नव्हता.
 मला असे आठवते की, सहज एक दिवस मी त्यांना रस म्हणजे काय, असा प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले, विद्वानांच्या परंपरेत अनेक विवाद्य गोष्टी असतात. त्याचा नक्की अर्थ कोणालाच माहिती नसतो. पण प्रथा म्हणून सगळे जण चर्चा करीत असतात. आपल्याकडे रस हा असा भाग आहे. पाश्चात्त्यात कॅथसिस हा असा भाग आहे. तुम्हालासुद्धा रसावर चर्चा करायला हरकत नाही. विशेषतः हा विषय समजून न घेता चर्चा करणे हे अधिक चांगले आहे. म्हणून तुम्ही या विषयावर चर्चा करा. तो समजून घेण्याच्या भानगडीत पडू नका. मी विचारले, विषय समजावून न घेता त्यावर चर्चा करता येईल, असे तुम्हाला वाटते काय? ते म्हणाले, काहीही समजून न घेता चर्चा करता येणे अतिशय सोपे असते. आपण स्वतः कोणताही मुद्दा मांडू नये. मुद्दा दुसऱ्याला मांडू द्यावा. आणि आपण फक्त दुसरा जे म्हणेल ते कसे चुकीचे आहे एवढेच सांगावे. सतत शंका घेत राहणे, सतत दुसन्याचे म्हणणे नाकबूल करणे हे दोन धागे तुम्ही पक्के धरून ठेवा आणि रसचर्चा करा. लवकरच या विषयावर तज्ज्ञ म्हणून तुम्हाला मान्यता मिळेल.
 रसचर्चेचा हा आरंभ मोठासा उत्साहदायक नव्हता. समोर आलेल्या माणसाला चटकन निरुत्साही करणे आणि त्याची बोळवण करणे ही प्रथा मला फारशी चांगली आणि योग्य वाटली नाही. पण यावाबत त्यांच्याशी वाद करून उपयोग नव्हता. कारण त्यांची प्रथा ती होती. मी घरी आलो आणि माझे मामा कै. डॉ. नांदापूरकर यांना रस म्हणजे काय, हा प्रश्न विचारला. नांदापूरकर हे कहाळेकरांचे गुरुजी. पण त्यांची प्रथा अगदी निराळी होती. कोणताही मुद्दा अत्यंत साधा, सोपा करून मांडणे आणि अभ्यासाला उत्तेजन देणं हे त्यांना कर्तव्य वाटे. नांदापूरकर म्हणाले, तुला मी अगदी थोडक्यात रस म्हणजे काय, हे सांगतो. आता असे पाहा, आपण आंब्याचा रस काढतो, कोयी आणि साली फेकून देतो. त्याऐवजी रस फेकून देऊन साली, कोयी खायला काय हरकत आहे ? आपण असे मानतो की, आंब्यामध्ये महत्त्वाचा भाग रस आहे. हाच मुद्दा कवितेला लागू करायचा. कवितेत तुमच्या मते सर्वांत महत्त्वाचा भाग कोणता आहे? हा जो काव्याचा सर्वांत महत्त्वाचा भाग याला रस असे म्हणावे.