पान:अभिवादन (Abhivadan).pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


प्रो. कोसंबी आणि भगवद्गीता । ४५


सूत-कथेत कृष्णाला किंवा नारायणीय धर्माला काही जागा असेलसे वाटत नाही. विशेषतः नारायणाच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, 'नारायणं नमस्कृत्यं' हा महाभारताचा नमनाचा श्लोक सुखठणकरांनी आधीच प्रक्षिप्त ठरवलेला आहे. (पांडवांच्या शेवटाविषयी कोसंबींचे विधान चुकीचे आहे. त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे जीवननिवृत्त होऊन लोक आश्रमात जात व अरण्यवासात देहत्याग करीत. विदुर, कुंती, धृतराष्ट्र यांचे मरण असेच आहे. पांडव आपल्या नातवाला अभिषेक करून जीवननिवृत्त झाले. पृथ्वी प्रदक्षिणा करून त्यांनी हिमालयात गमन केले व वाटचाल करताना प्रत्येकाने देहत्याग केला. या कल्पना प्रक्षिप्त असू शकतील. पण त्या भारतीय संस्कृतीतील आदर्श मरणावाबत सर्वसामान्य रूढ संकेतांना अनुसरून आहेत. त्यांचा पांडवांच्या 'शोचनीय ' अंताशी संबंध नाही. कोसंवी समजतात त्याप्रमाणे परीक्षिताला अभिषेक तक्षशिलेला झाला नाही किंवा तक्षशिला जनमेजयाची राजधानीही नव्हती. जनमेजय व परीक्षित यांची राजधानी हस्तिनापूरच होती. फक्त सर्पसत्र तक्षशिलेला चालले होते.
 भगवद्गीतेचा म. गांधी, टिळक आणि ज्ञानेश्वर यांच्यावर फार मोठा परिणाम झालेला आहे. तसा तो शंकराचार्य आणि रामानुज यांच्यावरही झालेला आहे. पण आमजनतेला या ग्रंथाची फारशी गरज वाटलेली दिसून येत नाही. काशीचा कोष्टी कबीर याचा गीतेशिवायच निर्वाह लागला. जयदेवाचे गीतगोविंद काय किंवा चैतन्याची संपूर्ण वैष्णव चळवळ काय हिला गीतेचा आधार नव्हता. शिखांच्या एवढ्या मोठ्या प्रचंड धार्मिक पुनरुत्थानाला गीतेपासून काही प्रेरणा मिळाली की काय याविषयी शंकाच आहे. पण वरिष्ठवर्गीय विचारवंतांना मात्र दरवेळी गीतेचा आधार घ्यावासा वाटला. इतिहासात शंकराचायांनी नेमके काय कार्य केले हे आपणाला समजत नाही. परंतु परंपरेप्रमाणे शंकराचार्यांनी बौद्धांचा पराभव केला, असे मानले जाते. शंकराचार्यानी बौद्धांचा पराभव केला यात ऐतिहासिक सत्य दिसते. मात्र हा पराभव बुद्धिवाद आणि प्रखर तर्कशास्त्र यांच्या आधारे झाला की काय याविषयी जबर शंका आहे. केवळ तर्कवाद धार्मिक श्रद्धांचे पराभव कधीच करू शकत नाहीत हा इतिहास आहे. शंकराचार्यांनी जे बौद्धांचे खंडन केलेले आहे, त्यावरून फक्त एकच गोष्ट कळते. ती म्हणजे ही की, गौतमबुद्धाच्या मूळ शिकवणुकी. विषयी शंकराचार्यांना किंचितसुद्धा माहिती नव्हती. ज्या वौद्ध विचारांवर आचार्य हल्ला करीत होते तो बुद्धधर्म चैत्यविहारांच्या आश्रयाने राहिलेला अधःपतित बुद्धधर्म होता आणि त्याचे अस्तित्व देशाच्या संपत्तीवर आणि अर्थव्यवस्थेवर एक निरर्थक ताण होता. शंकराचार्यांच्या कार्यामुळे भारभूत झालेल्या या बौद्ध शोषणाची समाप्ती झालेली दिसते. पुढे चालून रामानुजाच्या काळात सर्व शैव. जमीनदार, सधन श्रीमंत लोक दिसतात आणि रामानुजांच्या वैष्णव विचारसरणीला आम .