पान:अभिवादन (Abhivadan).pdf/47

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


४४ । अभिवादन
 जर महाभारतात सांगितल्याप्रमाणे खरोखरच भारतीय युद्ध अठरा दिवस लढले गेले असेल आणि या युद्धात दोन्ही बाजूने मिळून अठरा अक्षौहिणी सेना भाग घेत असतील तर मग सुमारे पन्नास लक्ष लोक या युद्धात भाग घेत होते, असे म्हणावे लागेल. आणि एक लक्ष तीस हजार रथ, तितकेच हत्ती, त्याच्या तिप्पट घोडे आणि एवढ्या प्रचंड सैन्याची पिछाडी सांभाळणे हाही प्रश्न जर विचारात घेतला तर .वीस कोटींच्या लोकसंख्येशिवाय एवढ्या मोठ्या सैन्याची उभारणी होऊ शकत नाही हे उघड दिसते. रथ, धनुष्यबाण आणि तलवारी यांच्यासाठी विपुल प्रमाणात लोखंड व पोलाद उपलब्ध असले पाहिजे. ऐतिहासिक पुरावा लक्षात घेता शेती करण्यासाठीसुद्धा नांगर वखरांचे फाळ म्हणून पुरेसे लोखंड भारतात इ. स. पूर्व सहाव्या शतकापर्यंत उपलब्ध होत नव्हते. ज्ञात असणारी सर्वांत प्रचंड ऐतिहासिक भारतीय सेना चंद्रगुप्त मौर्याची आहे. पण ही सेनासुद्धा चार लक्षाची होती. आणि तिची उभारणी (पिप्पिलवनच्या या क्षत्रिय राजाने) नुकत्याच ताब्यात आलेल्या गंगेच्या खोऱ्यातील प्रदेशाच्या बळावर करण्यात आलेली होती. पत्ती, गुल्म, अक्षौहिणी या शब्दांना जे अर्थ उत्तर काळात प्राप्त झाले ते जुन्या काळात नव्हतेच. म्हणून भारतीय युद्धाचा आढावा पुष्कळसा काल्पनिकच मानला पाहिजे. युद्धशास्त्राच्या दृष्टीने घोडे ज्या लढाईत वापरले जातात त्या लढाईत रथ निरुपयोगी ठरतात. सिकंदर विरोधी पोरस या लढाईत हा अनुभव आलेलाच होता. अशा अवस्थेत सुमारे चार लक्ष घोडे ज्या युद्धात भाग घेत होते, त्या युद्धात सर्व मोठे सेनानी रथात बसून लढत होते या काव्यावर विश्वास बसणे कठीण आहे. (ऐतिहासिक लढायांची वर्णने जेव्हा आपण पाहतो त्या वेळी समोरासमोर तळ देऊन “बसलेल्या फौजा अधूनमधून छोट्या झटापटी करीत असताना दिसतात. पण निर्णायक लढाई एकदा सकाळी सुरुवात झाली म्हणजे संध्याकाळपर्यंत कोणत्यातरी बाजूने युद्धाचा निकाल होतोच. शिकंदर विरोधी पोरस, घोरी विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण किंवा मराठे विरुद्ध अब्दाली या सर्व लढायांत निर्णायक लढाई एका दिवसाचीच आहे. अशा अवस्थेत भारतीय युद्ध अठरा दिवस चालू होते हाही एक कल्पनेचा खेळच मानला पाहिजे.
 मूळ महाभारत सूतांनी राजदरबारी गायिलेले आहे. या मूळ सूतांच्या कहाणीत कौरवांचा पराजय एक धोर दैवदुविलास म्हणून रंगविला होता की काय असे वाटत राहते. कारण बौद्ध वाङमयातील कुलधम्म जातकात कुरूंचे अजिंक्यत्व व त्यांचे श्रेष्ठ चारित्र्यच सांगितलेले आहे. आजच्याही महाभारतात पांडव हे जंगलात हिमालय चढत असताता एकाकी शोचनीय अवस्थेत मेलेलेच दिसतात. 'कौरवांना विनासायास स्वर्गप्राप्ती व्हावी आणि युधिष्ठिराला मात्र नरकदर्शन झाल्यानंतर स्वर्गप्राप्ती व्हावी हेही विचारात घेण्याजोगे आहे. या मूळ महाभारतीय