पान:अभिवादन (Abhivadan).pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


४६ : अभिवादन



जनतेतून एक प्रचंड पाठिंबा मिळालेला दिसतो. इ.स.च्या दहाव्या-अकराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत स्मार्त आणि वैष्णव परस्परांशी लढत होते. एकमेकाला लुटीत होते. एकमेकांची डोकीही फोडत होते. खरोखरी ही सारी मंडळी विवर्तवाद की परिणामवाद, द्वैत की विशिष्टाद्वैत या तात्त्विक मुद्द्यासाठी लढत होती की काय ? तात्त्विक बारकाव्यांसाठी हा लढा दिसत नाही. आपापसात दीर्घ द्वेष आणि वैर असणारे, एकमेकांचा घात करणारे शैव-वैष्णव दोघांच्याही देवधर्माचा निर्घणपणे नाश करणाऱ्या मुसलमानांचे मात्र प्रामाणिकपणे सेवाकार्य करीत होते. या घटना डोळ्यांसमोर ठेवल्या आणि तरीही शंकर-रामानुज यांना गीतेचा आधार घ्यावासा वाटला- ज्याची कबीर-चैतन्यांना गरज वाटली नाही- हे पाहिले म्हणजे प्रश्न पडतो की, गीतेचा आधार या तरी मंडळींना का घ्यावासा वाटला? याला माझे उत्तर असे आहे की, जातिव्यवस्थेची चौकट अमान्य न करता प्रस्थापित ब्राह्मण तर्कशास्त्राच्या आधारे प्रस्थापित समाजव्यवस्थेतील एखाद्या घटनेविरुद्ध बंड करताना वापरता येईल, ज्यातून प्रेरणा घेता येईल, ज्यातून समर्थन घेता येईल, असा गीता हाच एक श्रुतिग्रंथ होता. इतर सर्व उपनिषदे आणि ध्रुतिग्रंथ आपल्याला हवा तो अर्थ काढून दाखविण्यासाठी उपयोगी पडणारे नव्हते. इतर ग्रंथांचे अर्थ निश्चित होते. जातिव्यवस्था मान्य केल्यानंतर उरलेल्या सर्व प्रश्नांवर गीता अनिश्चित होती हे तिच्या प्रामाण्याचे सर्वांत मोठे कारण असावे.
 (कोसंबीच्या वरील विवेचनात सातवे ते चौदावे शतक शैव मार्ग हा वरिष्ठ वर्गाचा मार्ग होता, हा महत्त्वाचा मुद्दा दिसतो; कारण या कालखंडातील राजे, महाराजे आणि सरदार प्रामुख्याने शैव आहेत. शैवांनी जैनांच्यावर विविध प्रकारचे अत्याचार केल्याचीसुद्धा या कालखंडात नोंद आहे. शैव-वैष्णवांचा विरोध या कालखंडात नोंदविलेला आहेच; पण त्याचे स्वरूप कोसंबींनी रंगविले आहे तसे व्यापक दिसत नाही. अधूनमधून शैव-वैष्णवांचे झगडे होत ; पण प्रामुख्याने दोन्ही संप्रदायांचे लोक परमतसहिष्णूच राहिले. शंकराचार्यांच्या बाबतीत मात्र कोसंबींचे विवेचन स्वीकारता येणे अशक्य आहे. कारण ब्रह्मसूत्रांत आचार्यांचे प्रमुख विरोधक सांख्य आहेत, गीताभाष्यात प्रमुख विरोधक समसमुच्चय आणि भेदाभेद मानणारा बौधायन आहे. आचार्यांचे विरोधक त्यांच्या ग्रंथावरून बौद्ध दिसत नाहीत. आनंदगिरीने लिहिलेला शांकर दिग्विजय पाहिला, तर त्यात आचार्यांचा झगडा तांत्रिक शैत आणि शक्तिसंप्रदायाशी व पूर्वमीमांसकाशी जितका दिसतो तसा बौद्धांशी दिसव नाही. शंकराचार्यांनी वौद्धांचा पराभव केला ही भूमिका ऐतिहासिक पुराव्यावर टिकणारी नव्हे. कारण आचार्यांच्या पूर्वीच बुद्ध धर्म उतारात पडल्याचा उल्लेख फाहीयान व हयूएनत्सांग यांच्या वर्णनांत सापडतो. दक्षिण भारतात चालुक्य, पल्लव, चौल, पांड्य आणि उत्तरेत प्रतिहार व पाल राजे आचार्यांना समकालीन होते.