पान:अभिवादन (Abhivadan).pdf/45

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


४२ । अभिवादनपुष्कळदा पुराव्यावर मात करीत असे आणि कोसंबी हेही माणूस होते त्यामुळे तपशील नोंदविताना एखादी बारीकसारीक चूक त्यांच्याही हातून घडत असे हे नाकारण्यात अर्थ नाही. अशा या महान पंडिताला श्रद्धांजली वाहण्याचा चांगला मार्ग म्हणजे त्यांच्या संशोधनाचा परिचय करून घेणे आणि शक्य तर त्याबाबत . आपली मते नोंदविणे हाच आहे, असे मला वाटते. म्हणून कोसंबीच्या भगवद्गीतेवरील लेखाचा परिचय या ठिकाणी करून देण्याचे ठरविले आहे. जोपर्यंत एखाद्या माणसाचे संशोधन ज्ञानाची कक्षा व्यापक करीत नेत आहे, नवनवी महत्त्वाची ठिकाणे आणि दुवे उजेडात आणीत आहे, नवे प्रश्न उपस्थित करीत आहे, तोपर्यंत लिखाण करणारा माणूस मार्क्सवादी अगर कम्युनिस्ट आहे म्हणून अस्पृश्यवत मानावा हा नवा जातीयवाद स्वीकारणे मला शक्य नाही.
 भगवद्गीतेवरील कोसंबींचा लेख हा मूळचा १९५९ सालचा आहे. तो थोडाफार सुधारून १९६० साली त्यांनी पुन्हा लिहिला. कोसंबी म्हणतात, भगवद्गीता या शब्दाचा अर्थ ज्याच्यावर भगवानाची कृपादृष्टी आहे त्याचे गाणे असा होतो. ही गीता, भारताचे श्रेष्ठ व प्रचंड महाकाव्य महाभारत याचा भाग आहे, आणि तिचे अठरा अध्याय आहेत. (महाभारतात भगवद्गीता भीष्मपर्वाचा भाग आहे. भीष्मपर्वाच्या २३ व्या अध्यायापासून गीतेला आरंभ होतो. आणि ती पुढे ४० व्या अध्यायापर्यंत चालू राहते.) हे अठरा अध्याय पांडव योद्धा अर्जुन आणि यदुकुलातील सारथी कृष्ण यांच्या संवादाचे आहेत. हा संवाद दिव्यदृष्टी असणाऱ्या संजयाने धृतराष्ट्राला सांगितलेला आहे. हा यादव वीर कृष्ण विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. दोन्ही सेना रणांगणावर परस्परांच्यासमोर उभ्या राहिल्यानंतर आता युद्धाला प्रारंभ होणार तोच अर्जुनाच्या मनात विषाद निर्माण झाला. या युद्धात आपल्या पुत्र-पौत्रांचा, गुरुजनांचा व स्वजनांचा मोठ्या प्रमाणावर घात होईल या भीतीने अर्जुनाचे हृदय त्रस्त झाले. या प्रसंगी अर्जुनाला भगवान कृष्णांनी विस्तृत उपदेश करण्यास व त्याच्या प्रत्येक शंकेचे समाधान करण्यास आरंभ केला. जो वेळपर्यंत अर्जुनाचा मोह संपत नाही आणि अर्जुन युद्धास तयार होत नाही तोपर्यंत कृष्णाचा हा उपदेश चालू होता. या भगवद्गीता ग्रंथाने भारताच्या इतिहासात विविध मनोवृत्तींच्या व्यक्तींची मने आकृष्ट करून घेतलेली आहेत. जे प्रत्यक्ष रणांगणावर लढाई करीत होते अशा मंडळींना भगवद्गीतेपासून किती प्रमाणात प्रेरणा मिळाली हा प्रश्न बाजूला ठेवला तरी या ग्रंथापासून भारतीय स्वातंत्र्याच्या संघर्षात लो. टिळक व म. गांधी यांनी प्रेरणा घेतलेली आहे. वारकरी संप्रदायाचा प्रवर्तक ज्ञानेश्वर, त्यांच्यापूर्वी शंकराचार्य व रामानुज, त्यांच्यानंतर मध्व व वल्लभ यांनीही गीतेपासून प्रेरणा घेतलेली आहे. ज्या ग्रंथापासून टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी लढयाची प्रेरणा घेतली त्या ग्रंथापासूनच अरविंदबाबूंनी