पान:अभिवादन (Abhivadan).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


प्रो. कोसंबी आणि भगवद्गीता । ४३


स्वातंत्र्यलढा सोडून आत्मचिंतनात मग्न होण्याची प्रेरणा घेतली. शैव आणि वैष्णव, योगमार्गी, ज्ञानमार्गी आणि भक्तिमार्गी, सुधारणावादी आणि सनातनी या सर्वांनाच अधूनमधून भगवद्गीतेपासून प्रेरणा मिळत असते. आणि प्रत्येक जण या ग्रंथाचा स्वतःला सोयीस्कर असा अर्थ लावीत असतो. परस्परविरोधी मनोवृत्तीच्या सर्वच मंडळींना ज्या ग्रंथात आपला इच्छित अर्थ शोधणे सोयीस्कर होते तो ग्रंथ कमालीचा संदिग्ध असला पाहिजे ही गोष्ट उघड आहे. आणि तरीही सर्वांनी या ग्रंथापासून प्रेरणा घेतली त्या अर्थी या ग्रंथाची कोणती तरी उपयुक्तता असली पाहिजे हेही उघड आहे.
 भांडारकर प्राच्यविद्यासंशोधन मंदिराने महाभारताची जी चिकित्सक आवृत्ती सिद्ध करण्याचे कार्य आरंभिलेले आहे, त्या प्रयत्नात भीष्मपर्व संपादित करताना भगवद्गीताही अधिकृतरीत्या संपादित होऊन गेलेली आहे. पण हे संपादन पुरेसे समाधानकारक नाही. संपूर्ण भारतीय चिकित्सक आवृत्ती संपादित करण्यासाठी जी धोरणे स्वीकारण्यात आली ती बाजूला ठेवून शांकरभाष्याला अनुसरून चिकित्सक आवृत्तीने गीतापाठ स्वीकारलेला आहे. ही पद्धत भगवदगीतेच्या ऐतिहासिक अभ्यासाला विरोधी आहे. (कोसंबींचा या चिकित्सक आवृत्तीवर मुख्य आक्षेप असा आहे की, दक्षिणी, उत्तरी आणि काश्मीरी भारतीय प्रतींच्या तौलनिक अभ्यासावर गीतेचे पाठ अधिकृत म्हणून स्वीकारायला हवे होते. तसे जर झाले असते तर जावात इ. स. च्या दहाव्या-अकराव्या शतकांत जे महाभारत पोचले त्या महाभारतात पंधरा, सोळा व सतरा हे अध्याय नाहीत व अठराव्या अध्यायातील फक्त ६६ आणि ७३ हे दोनच श्लोक आहेत. ही बाब विचारात घ्यावी लागली असती. ननय्यांच्या आंध्र महाभारतात भगवद्गीता फक्त अकराव्या अध्यायापर्यंतच आहे. पुढे अठराव्या अध्यायाच्या ६६ व्या श्लोकापासूनचा पुढचा भाग आहे. याही घटना चिकित्सक आवृत्ती सिद्ध करताना विचारात घ्याव्या लागल्या असत्या. एका परंपरेत गीता चौदा अध्यायांची आहे, दुसऱ्या परंपरेत ती अकरा अध्यायांची आहे. याची नोंद न घेता शंकराचार्यांना अनुसरून गीतेची आवृत्ती सिद्ध करणे ही गोष्ट कोसंबींना आक्षेपार्ह वाटते. चिकित्सक आवृत्तीचे संपादक डॉ. बेलवलकर यांचे म्हणणे असे की, सर्व महाभारतीय प्रती १६ व्या शतकातल्या किंवा नंतरच्या आहेत. जावा, भारत आणि ननय्याचे भारत दहाव्या-अकराव्या शतकातील आहे. शंकराचार्य आठव्या शतकातील असल्यामुळे आचार्यांचा पाठ हा उपलब्ध सर्वांत प्राचीन पाठ आहे, म्हणून तो आम्ही स्वीकारतो. मी या प्रश्नावर कोसंबी यांचे मत रास्त आहे असे मानणारा आहे. कारण आचार्य आठव्या शतकातील असले तरी आचार्य भाष्याच्या हस्तलिखित प्रती आठव्या शतकातल्या नाहीत. त्या महाभारताच्या प्रतीप्रमाणेच अर्वाचीन प्रती आहेत.)