पान:अभिवादन (Abhivadan).pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुक्त-मयूरांची भारते । ३१

आहेत. एकंदरीत त्यांचे स्वभावरेखन व्यासांना उणे असले तरी बहुधा ते व्यासांशी जवळजवळ समानगुण होऊ शकतात. क्वचित व्यासांवरही ताण करतात. मोरोपंतांची पुष्कळशी पर्वे या प्रबंधाच्या कक्षेबाहेर गेली आहेत. नाहीतर पंतांचे स्वभावरेखनातील स्वातंत्र्य आणि हे स्वातंत्र्य घेऊनही त्यांनी मिळविलेले महान यश, त्यांचे प्राचीन मराठी काव्यांत अजोड असणारे संभाषणकौशल्य अण्णांनी गौरविल्याविना सोडले नसते. स्वभावरेखन हाच माझ्या मते मोरोपंतांचा असा एकमेव गुण आहे की, ज्यात त्यांची नवनिर्मिती आहे. या नवनिर्मितीमुळे स्वतंत्र संगती साधली आहे. आणि त्या क्षेत्रात मुक्तेश्वरांपेक्षा उघडच कितीतरी पटीने ते अधिक श्रेष्ठ आहेत. व्यासांनी आपली पात्रे राजकारणपटु गृहीत धरली त्यामुळे स्वभावरेखनातील गंतागुंत वाढविण्यात व ती चित्रित करण्यात त्यांनी उज्ज्वल यश संपादिले आहे. पण पंतांची पात्रे मुळातच यापेक्षा भिन्न आहेत. त्यांची धर्म, द्रौपदी, भीम, अर्जुन ही पात्रे भक्त, उदार, शूर आणि सरळ आहेत. त्यांच्या स्वभावात तितक्या गुंतागुंतीचे कारणच नव्हते. हे जर ध्यानात घेतले तर नांदापूरकरांनी व्यास-पंतांतील अंतर खरोखरी जितके मोठे दाखविले आहे तितके मोठे ते नाही हे उमगणे कठीण जाऊ नये. इतिहास म्हणून भारताकडे पाहताना धृतराष्ट्र हे फारसे महत्त्वाचे पात्र उरत नाही. पण पहिल्या चार पर्वांत व सौप्तिकपर्वात म्हणजे अण्णांच्या प्रवंधविषयात काव्य म्हणून पाहताना धृतराष्ट्र हे धर्माइतकेच महत्त्वाचे पात्र आहे हे ओळखण्यात अण्णांची मार्मिकता आहे. महाभारतातील धृतराष्ट्राच्या स्वभावाचे वदलत जाणारे रंग अण्णांनी हळुवार हातांनी उलगडले आहेत. धृतराष्ट्रापर्यंत त्यांच्या सहानुभूतीचा हात पोचला यातच महाभारताचे काव्य म्हणून अवलोकन करण्यात अण्णांना लाभलेले अप्रतिम यश दडलेले आहे.
 आठव्या उन्मेषात तिघाही कवींच्या रसंवत्तेचा तौलनिक आढावा आला आहे. अण्णांची रसविषयक दृष्टी मार्मिक असली तरी संस्कृतसाहित्यशास्त्राशी ती जुळणारी नाही. रसवत्ता म्हणजे काय, याबाबत संस्कृतातील साहित्यशास्त्रज्ञ भले काहीही म्हणोत; पण संस्कृत आणि मराठी कवींनी रसवत्तेच्या त्या कसोटया पाळल्या आहेत असे म्हणवत नाही. साहित्यशास्त्रज्ञांनी आपल्या पुस्तकांतून जे म्हटले, पण संस्कृत कवींनी आपल्या काव्यपरंपरेत जे नेहमी ओलांडले ते गृहीत धरून त्या आधारे मुक्त-मयूरांची आणि व्यासांची रसवत्ता मोजताना सर्वांवरच थोडाफार अन्याय होण्याचा संभव आहे. पण हा अन्याय सर्वांवर सारखा होणार असल्यामुळे निष्कर्षावर त्याचा परिणाम फारसा होणार नाही, आणि तसा तो झालेलाही नाही. उदा. अण्णांनी पाच पर्वांत, बावीस ठिकाणे शृंगाररसाची म्हणून नोंदविली आहेत. आणि यांपैकी किती ठिकाणी कवित्रयांनी रस निर्माण केले याचे विवेचन केले आहे. क्वचित असा प्रसंग येतो की, ज्या ठिकाणी महाभारतकारांनी रस रंगवलेला नाही