पान:अभिवादन (Abhivadan).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३२ । अभिवादन

आणि मराठी कवींनी त्या ठिकाणी रसवत्ता प्रकट केली आहे, तर क्वचित व्यासमुक्तेश्वरांनी रस रंगवूनही मोरोपंतांनी त्या ठिकाणी रसनिर्मिती केलेली नाही. मला या पद्धतीने विवेचन करणे हेच धोक्याचे वाटते. जीवनाचे अनुकरण करून कथानकातल्या अमुक प्रसंगावर अमुक रस निर्माण झाला पाहिजे असे म्हणण्यात फारसा अर्थ नाही. उदा० विचित्रवीर्य-मरणप्रसंगी राजपत्न्यांना झालेला शोक आणि सत्यवतीला झालेला शोक ही रसांची दोन स्थळे आहेत असे म्हणणे बरोबर नाही. कारण एखाद्या कवीला हा सारा प्रसंगच गौण वाटेल. क्वचित एखाद्याला महामुनी व्यासांना नियोगाची संधी मिळावी यासाठी ईश्वराने दाखवलेले लीलाकौतुक वाटेल. काव्यांतील कथानके नाट्यधर्मी असतात. अमुक प्रसंग अमुक रसाचा आहे अशी नोंद करणे बरोबर नाही. सुभद्राहरणप्रसंगी मुक्तेश्वरांनी बलरामाचा क्रोध सुंदर रंगविला आहे. मोरोपंतांत व मुळात या ठिकाणी रौद्ररस नाही अशी तुलना नांदापूरकर करतात. व्यासांना व मोरोपंतांना आपल्या विकल्पनात हे रौद्ररसाचे स्थळ म्हणून प्रतीत झाले नसेल, पण त्यामुळे मुक्तेश्वरांनी हा प्रसंग दोघांपेक्षा सुंदर रंगविला हे म्हणण्यात अर्थ नाही.
 अजून एक बाब म्हणजे एखाद्या प्रसंगी नांदापूरकर जी मते देतात ती कविपरंपरेला अमान्य आहेत. पराशर आणि मत्स्यगंधेचा मीलन-प्रसंग म्हणजे एका तापसाच्या जीवनातील प्रबल विकारांचा क्षणिक आविष्कार. अशा क्षणिक आविष्काराचे मुक्तेश्वरांनी विस्तृत कल्पनाविलासाने केलेले चित्रण त्यांना अनाठायी वाटते. पण ही भूमिका कविपरंपरेला मान्य नाही. बाणभट्टासारखा महाकवी राजदरबारी आलेल्या मातंगीचे सरस शृंगारिक वर्णन जेव्हा करतो तेव्हा जर नांदापूरकर बाणभट्टाला म्हणाले, " हे महाकवे, ही मातंगी तुझ्या कथानकात गौण आहे. तिच्यावर कुणाची रती नाही. तिचीही रती कुणावर नाही, पोपट झालेला वैशंपायन योग्य स्थळी नेणे इतकेच तिचे कथानकात स्थान आहे. तिच्या वर्णनाला एवढा विस्तार, एवढा कल्पनाविलास अनुचित आहे." तर बाण इतकेच म्हणेल, " विचार करण्याची ही पद्धती माझ्या कविपरंपरेला अमान्य आहे." औचित्यमूलक रसपरिपोष हे मुख्य सूत्र जरी मानले तरी आजच्या आमच्या औचित्याच्या कल्पना त्यांना मान्य नव्हत्या. आमच्या साहित्यशास्त्रीय भूमिकेवरून जगातील कोणत्याही काळाचा, स्थळाचा आणि भाषेचा कवी आम्ही मोजू, ही भूमिका स्वीकारणे बरोबर; की त्या त्या कवीच्या काळात जाऊन त्याचे मूल्यमापन करणे बरोबर, हा वादग्रस्त प्रश्न आहे.
 नांदापूरकरांनी प्रस्तुत उन्मेषात एकंदर सात रसांचे विवेचन केले आहे. रसानुबंधात कोणकोणत्या अंगाकडे लक्ष द्यावे लागते हे त्यांनी विस्ताराने दाखविले आहे. प्रत्येक प्रसंगी तिघांची तुलना करून शिवाय एकेका रसाच्या समाप्तीनंतर