पान:अभिवादन (Abhivadan).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३० । अभिवादन

हिडिंबाचा वधं झाल्यानंतर भीम हिडिंबेला वधू इच्छितो. पण धर्माने त्याला आवरले आहे. ही त्याची दया त्याच्या अहंतेतून निर्माण होते. ही बापडी आपले काय करणार? म्हणून हे भीमा, हिचा वध करू नकोस, असे तो म्हणतो. अशा एक न दोन शेकडो घटका नांदापूरकरांनी एकापुढे एक मांडून धर्माचे चरित्र आणि चारित्र्य स्वच्छ करून पुढे मांडले आहे. असाच प्रकार दुर्योधनाच्या बाबतीतही आहे. मुळांतील दुर्योधन धोरणी, पाताळयंत्री, अभिमानी, संभाषणकुशल, प्रयत्नवादी, स्वहिंततत्पर असा आहे. तो पांडवांचा वैरी आहे, पण प्रजेचा शत्रू नाही. पांडवांशी असणारे त्याचे वैर राजकारणाचे आहे. त्यांचा अपमान करण्याची एकही संधी तो दवडू इच्छीत नाही. पण दुर्योधनही उदार आहे. मित्रनिष्ठ आहे. तो स्वभावाने वाईट नाही. मुळातील द्रौपदीही अतिशय संयमी, धोरणी, राजकारणपटू आहे. अण्णांनी या साऱ्याच पात्रांच्या मुळातील स्वभावरेखा पद्धतशीरपणे रेखाटून भारताच्या आकलनात मराठी वाचकांची जी पद्धतशीर प्रगती घडवून आणली आहे त्याबद्दलं मराठी वाचक त्यांचे नेहमी कृतज्ञ राहतील. बारीकसारीक खाचाखोचा आणि मर्मग्राही वाक्ये यांवर भर न देता जर आजही आहे या अवस्थेत महाभारत वांचले तर भारतीय धर्म प्रथमदर्शनी ईश्वरशरण आणि भोळा वाटतो, हे नाकारता येणार नाही. अण्णांनी मुळातील धर्माचे मार्मिक रेखाटन केले आहे, पण स्वभावरेखाटनाची वापरलेली येथील पद्धती विश्लेषक ऐतिहासिक भूमिकेची आहे. ही भूमिका ज्या काळी महाराष्ट्रात उगवलीच नव्हती त्या काळातील सर्वांनाच धर्म 'भक्त' वाटला. सर्वांनीच तसा तो रंगविला. मुक्त-मयूरांनी धर्म ईश्वरभक्त रंगवला असेल, तर त्यात त्यांची कुठलीही पृथगात्मता नाही. ते त्या काळचे धर्माचे सर्वमान्य मूल्यमापन होते. यातून स्वभावरेखेत जो फरक पडतो त्याला नवनिर्मिती मानवी ही अण्णांची इच्छा सर्वांनाच पटेल असे नाही.
 स्वभावरेखनाचे नांदापूरकरांचे निष्कर्ष असे आहेत. त्यांच्या मते भारतकार स्वभावरेखनात फारच कुशल आहेत. त्यांनी निर्मिलेली पात्रे मानवी, नैसर्गिक व गतिमान, विकासक्षम आहेत. भावनांची गुंतागुंत, कार्यकारणभाव, गुणदोषांचा हळुवार आविष्कार आणि मानवी मनाची गूढता चित्रिण्यात त्यांना फार मोठे यश आले आहे. मुक्तेश्वरांची पात्रे मानवी आहेत, तशीच अद्भुतही आहेत. त्यांचा स्वभावविकास नैसर्गिक नाही. त्यांच्या आचरणांत विसंगती आहे. ती धड भक्ताप्रमाणही वागत नाहीत. व्यक्तींची लहानसहान वैशिष्टये त्यांना रंगविता येत नाहीत. भावनांची गुंतागुंत त्यांना साधत नाही. मोरोपंतांचे व्यक्तिचित्रण कौशल्याचे आहे. स्वकालीन, धार्मिक व सामाजिक कल्पनांचा पगडा त्यांच्यावर असूनसुद्धा त्यांनी पात्रांच्या स्वभावांतील मानवता शक्यतो लोपू दिली नाही; पात्रांचा विकास, त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांच्या बारीकसारीक छटा कौशल्याने रंगविल्या