पान:अभिवादन (Abhivadan).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुक्त-मयूरांची भारत । २९

भाग प्रत्येकाने एक वेळ डोळ्यांखालून घालण्याइतका महत्त्वाचा आहे. सामान्यतः विद्वानांनाही भारत कथानकातील मर्माचे नेहमीच आकलन झालेले असते असे . आढळत नाही. द्रौपदीची दोन महिने बारा दिवस अशी पाच भावांतील वाटणी प्रक्षिप्त आहे, हे इथेच कळते. द्यूतप्रसंगी धर्माची जिद्द पंचनद जिंकण्याची होती. पंचनंदाच्या लोभात पडून त्याने सर्वस्व गमावले हेही इथेच कळते. उत्तर-गोग्रहण प्रसंगी अर्जुनाजवळ थोडी का होईना पण फौज होती; आणि द्रौपदीशी पाचांनी लग्न केले याचे कारण केवळ मातृज्ञा नसून सर्वांच्याच मनात तिजंविषयी निर्माण झालेली अभिलाषा होती, हेही इथेच कळते. बारीकसारीकही खाचाखोचा कळून व्यासांच्या महान प्रज्ञेचे दर्शन होण्यासाठी निदान मुळातील कथानक प्रामाणिकपणे ज्ञात असले पाहिजे.
 सहज ओघाने आले म्हणून लिहितो. मूळ महाभारतात ययाती पापभीरू असून शर्मिष्ठा आक्रमक असल्याचे दाखविले आहे. मुक्तेश्वरांनी ययाती आक्रमक असल्याचे दाखविले आहे, असे अण्णा म्हणतात. पण मुक्तेश्वरांत दोन्ही प्रकार आहेत. काही प्रतीत भारतानुसार शर्मिष्ठा आक्रमक असल्याच्या ओव्या आहेत, तर काहींत ययाती आक्रमक असल्याच्या. मुक्तेश्वर बहुधा सर्वत्र पुरुष आक्रमक असल्याचे दाखविण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांच्या सवयीप्रमाणे पाहिले तर ययाती आक्रमक असणारा भाग प्रमाणित मानला पाहिजे. मूलानुसार शर्मिष्ठेला आक्रमक ठरविले पाहिजे. या प्रकरणी अण्णांनी मुक्तेश्वराला दिलेला दोष नव्या प्रतीमुळे संशयास्पद करतो.
  चौथ्या उन्मेषात अण्णांनी युधिष्ठिर, दुर्योधन, भीम, अर्जुन, द्रौपदी, धृतराष्ट्र या सहा पात्रांच्या व्यक्तिरेखा तुलनेसाठी घेतल्या आहेत आणि त्यांचा तौलनिक अभ्यास पुढे मांडला आहे. या व्यक्तिरेखनात त्यांनी केलेले व्यासांच्या युधिष्ठिराच्या व्यक्तिरेखेचे उद्घाटन सर्वथैव स्वतंत्र, मार्मिक आणि पटण्याजोगे असेच आहे. सर्वांनी धर्मभोळा, ईश्वरशरण आणि दुबळा सज्जन मानलेला धर्मराज मूळ महाभारतात धोरणी, संयमी, कारस्थानपटू, व्यवहारचतुर, राजकारणी, समयसूचक, धूर्त, आर्जवी, अहंतापूर्ण, मिठासवाणीचा असा आहे, हे त्यांनी अत्यंत मार्मिकपणे दाखवून दिले आहे. वारणावतास लाक्षागृहात जाळण्यासाठी पांडव पाठविले गेले त्या आधी युधिष्ठिर युवराज झालेला होता. धृतराष्ट्र जिवंत असतानाच त्याला पदच्युत करून धर्माला गादीवर बसविण्याची चर्चा राजधानीत सर्वत्र चालू होती आणि धर्माने कधी अशा चर्चाना नापसंती दाखविलेली नव्हती. इथून धर्माच्या राजकारणपटुत्वाचे एकेक पवित्र दिसू लागतात. वारणावतास गेल्यानंतर पुरोचनाला सतत झुलवीत ठेवून योग्य वेळ येताच तो स्वत: आक्रमक बनतो. आपल्या बचावाच्या कारस्थानावर ब्राह्मण-भोजनाची धार्मिक झूल घालण्यास तो विसरत नाही.