पान:अभिवादन (Abhivadan).pdf/27

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४ । अभिवादन

जरीता-सात, वार्क्षी-दहा इ. इ. पण या उल्लेखांवरून महाभारतकाळी शिष्टसमाजात क्वचित का होईना बहुपतित्व असे हे सिद्ध होत नाही. कारण ही उदाहरणे निश्चित या Polyondry ची नाहीत. ती सर्व भावांत अगर सर्व कुटुंबात एक समाईक पत्नी पत्करण्याची आहेत. बहुपतित्वासाठी, भिन्न गोत्र-कुलांच्या, एकाधिक पुरुषांच्या बरोबर, एका वेळी एकाच स्त्रीचे लग्न दाखविले पाहिजे. निर्भेळ असे बहुपतित्वाचे उदाहरण माझ्या पाहण्यात नाही. अण्णांनी स्वयंवराचा उल्लेख केला आहे. पण स्वयंवर म्हणजे मुलीला आपला नवरा निवडण्याचा हक्क नव्हे, हे त्यांनी दुर्लक्षिले आहे. स्वयंवरात एक तर मुलीच्या बापाने आपल्या बरोबरीच्या लोकांना आमंत्रित केलेले असे. बापाला नको असणारी मंडळी आमंत्रितच नसत. या बापाने निवडलेल्या अनेकांतून कोणताही एक निवडण्याचा मुलीचा हक्क म्हणजे स्वयंवर. किंवा पित्याने आपल्या मर्जीने 'पण' लावावा. तो 'पण' जिंकणारा ती मुलगी जिंकतो, असा खेळलेला मुलीवरचा क्षत्रियोचित जुगार. यामुळेच स्वयंवरांतून अनेकदा युद्ध निर्माण होई.
 सामाजिक परिस्थितीतील एक महत्त्वाचा मुद्दा अभिमन्यूच्या वयासंबंधी आहे. अभिमन्यूचे वय मृत्युसमयी १६ वर्षांचे होते अशी सर्वसाधारण समजूत होती. आणि यामुळे वैद्यांनी उत्तराभिमन्युविवाह बालप्रौढा विवाहाचा प्रकार गृहीत धरला आहे. अण्णांनी अनेकविध प्रमाणे देऊन अभिमन्यूचे वय विवाहासमयी चांगलेच प्रौढ होते व मृत्युसमयी ३२ वर्षांचे होते हे सिद्ध केले आहे. अण्णांच्या या विधानाला विरोधी जाणारी फक्त दोनच प्रमाणे सर्व महाभारतात मिळून आहेत. त्यांतील एक आदिपर्वातील : हा सोळावे वर्षी मजकडे परत येईल असे चंद्राच्या तोंडी आले आहे. पण चिकित्सक आवृत्तीत हे विधान प्रक्षिप्त ठरविण्यात आले आहे. दुसरे म्हणजे विराटपर्वातील अर्जुन, उत्तर गोग्रहणात गांडीव धनुष्य आपल्या हाती घेऊन ६५ वर्षे झाली असे म्हणतो. गांडीव अर्जुनाच्या हाती येण्याच्या सुमारास अभिमन्यू जन्मला पण सर्व विद्वानांनी या ठिकाणी वर्ष हा शब्द सहा महिने याचा बोधक गृहीत धरला आहे. त्यामुळे मृत्युसमयी अभिमन्यूचे वय ३२ वर्षांच्या आसपास होते हे नांदापूरकरांचे मत सिद्ध झाले असे म्हणावयास हरकत नाही. अभिमन्यूशी निगडित असणारा अजून एक प्रश्न मात्र नांदापूरकरांनी वगळला आहे. पांडवांच्या मध्ये धर्म हा सर्वांत वडील. धर्मापासून द्रौपदीला झालेला मुलगा पांडवांच्या पट्टराणीचा सर्वांत वडील मुलगा. मग गादीचा हक्क धर्माच्या नातवाला न जाता अर्जुनाच्या नातवाकडे का गेला? कदाचित हा प्रश्न महाप्रस्थानपर्वाचा असल्यामुळे त्यांनी स्पर्शिला नसावा.
 सामाजिक परिस्थितीच्या या प्रकरणात असे तपशिलाच्या मतभेदाचे मुद्दे आहेत. पण अण्णांनी ज्या बारकाईने व काटेकोरपणे आपला कल्पनाविलास न