पान:अभिवादन (Abhivadan).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुक्त-मयूरांची भारते । २५

लढवता महाभारतातील सामाजिक परिस्थितीचे संकलन केले आहे, तितके इतरत्र क्वचितच आढळते हे नाकारता येणार नाही. उद्याच्या ऐतिहासिक विश्लेषकांना व विवेचकांना आपले संकलनाचे जवळजवळ ७/८ श्रम नांदापूरकरांनी वाचविले आहेत याबद्दल खात्री होईल. या संकलित माहितीची मीमांसा करणे अण्णांनी अजिबात टाळले आहे. आणि नागपूर विद्यापीठाने कवींच्या काव्याच्या तौलनिक अभ्यासात सामाजिक परिस्थितीचे शुक्लकाष्ठ घुसविण्याचा अव्यापारेषु व्यापार केला नसता तर हे संकलन स्वतंत्ररीत्या विस्ताराने करता आले नसते. मूळ हस्तलिखितातील हे प्रकरण सुमारे आजच्या छापील ग्रंथातील ३०० च्या वर पाने व्हावीत इतके मोठे आहे. याही प्रकरणात अण्णांनी तुलनेसाठी मुक्त-मयूरकालीन सामाजिक परिस्थिती घेतलीच आहे. पण समकालीन विपुल व विविध पुराव्यांच्या आधारे जेवढे साधार व विविध निष्कर्ष निघतात, तितके केवळ काव्यांतून निघत नाहीत. त्यामुळे मुक्तमयूरकालीन सामाजिक परिस्थितीचा या प्रबंधात घेतलेला आढावा तितकासा महत्त्वाचा म्हणता येणार नाही.
 नांदापूरकरांच्या प्रबंधाचा साहित्यशास्त्रीय भाग उन्मेष २-३-४ आणि ८-९-१० या ६ प्रकरणांत मिळून आहे. या सहा प्रकरणांनी मिळून प्रबंधाची ५२५ च्या वर पृष्ठे व्यापिलेली आहेत. हा सर्व विभाग त्यांची अभिजात रसिकता, निःपक्षता, मार्मिकता, बारकाईचा व्यासंग यासाठी मराठी वाङमयात दीर्घकाल आदरीला जाईल असा आहे. दुसऱ्या उन्मेषात महाभारताचे मुख्य कथानक तुलनेसाठी घेऊन मुक्त-मयूरांनी त्यात कोणकोणते फेरफार केले, त्यामुळे काव्याचे सौंदर्य कसकसे उणावले अगर वृद्धिंगत झाले ह्याची मुद्देसूद चर्चा आहे. कथानकाचा मूळ महाभारतातील एक तुकडा नांदापूरकर विचारासाठी घेतात आणि हा विभाग मुक्तेश्वरांनी कसा रंगविला, मोरोपंत यांनी कसा रंगविला आहे या विषयीचे विवेचन करून ते शेवटी आपले मत नोंदवतात. या क्रमाने पाचही पर्वांतील कथानकाचा सांगोपांग विचार या उन्मेषात येऊन गेला आहे. तिसऱ्या उन्मेषात उभय मराठी कवींनी आणि भारतकारांनी आपल्या ग्रंथांतून रंगविलेल्या उपकथानकांचा असाच विस्तृत तौलनिक विचार येऊन चुकला आहे. या दोन प्रकरणांच्या चर्चेनंतर कथानकविषयक त्यांनी काढलेला निष्कर्ष खालीलप्रमाणे आहे.
 कथानकाचे अनुसरण करण्यात उभय मराठी कवींनी बहुतेक. व्यासांचा मागोवा घेतला आहे. पण कथानकरचना करताना मात्र दोघांनीही फिरवाफिरवीचे स्वातंत्र्य दाखविले आहे. या कथानकांच्या फेरफारात अनेक मागील प्रसंग पुढे चित्रिले गेले. पुढील प्रसंग आधी आले. मुक्तेश्वरात हा प्रकार मोरोपंतांपेक्षा जास्त आढळतो. सामान्यपणे या ढवळाढवळीने कथानकाचे अनुसंधान विस्कळीत झाले अ...२