पान:अभिवादन (Abhivadan).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८ । अभिवादन

म्हणता यावयाचे नाही. हयूएनत्संगचा प्रवासवृत्तांत इतिहासाचे केवढेही मोठे साधन असो त्या ग्रंथाच्या लेखनाची प्रेरणा इतिहासलेखन ही नव्हती. अण्णा महाभारताला एक काव्यग्रंथ समजतात रसाची आणि स्वभावरेखनाची कसोटीही या ग्रंथाला ते लावतात, पण त्यासाठी अनेकविध विसंगती पत्कराव्या लागतात. महाभारत हा जर काव्यग्रंथ म्हणावयाचा, क्षणभरासाठी तो जसा आहे तसाच मुळात लिहिला गेला असे मानायचे तर त्याची कथानकरचना शिथिल आहे, त्यात पाल्हाळ आणि पुनरुक्ती भरपूर आहे आणि पुनरुक्तीने भरलेल्या तत्त्वचर्चेकडे कवीने जितके लक्ष दिले आहे तितके रसनिर्मितीकडे दिले नाही, या निर्णयावर येऊन पोचावे लागेल.
 १२ व्या उन्मेषात नांदापूरकर मुक्तेश्वरविषयक इतर काही प्रश्नांकडे वळले आहेत. अर्थातच मुक्तेश्वरांच्या काव्याच्या प्रमाणप्रतीच्या आवश्यकतेकडे त्यांनी आधी वळावे हे ओघाने आलेच. सुदैवाने मोरोपंतांच्या काव्याच्या अधिकृत प्रती उपलब्ध असल्यामुळे हा प्रबंध लिहिला जात असतानाच मूळ महाभारताची चिकित्सक आवृत्ती सुखटणकर संपादन करीत असल्यामुळे या दोघांचा प्रश्न नव्हता. प्रश्न मुक्तेश्वरांचा होता, व आजही तितकाच महत्त्वाचा उरला आहे. अशात प्रियोळकरांनी मुक्तेश्वरांच्या संहितेची चिकित्सक आवृत्ती संपादन करण्याचे कार्य सुरू केले आहे. प्रियोळकरांजवळील जुन्यात जुनी पोथी शके १६७४ ची आहे. माझ्या माहितीप्रमाणे शके १६७२ च्या ' वसुमती' प्रतीची बातमी संशोधकांना प्रियोळकरांचे कार्य सुरू होण्याच्या आधी चिं. नी. जोशी यांनी दिली होती. मुक्तेश्वरांच्या प्रमाण संहितेसाठी या वसुमती प्रतीची मदत केवढी मोठी होणार आहे यावर प्रस्तुत प्रबंधात नांदापूरकरांनी टाकलेला प्रकाश हा सौम्यतम निषेधाचा एक प्रकार आहे: 'प्रतिष्ठान' नोव्हेंबर १९५३ च्या अंकात नांदापूरकरांनी वसुमतीप्रत. वापरली न गेल्यामुळे आजच्या चिकित्सक आवृत्तीत जे प्रकार झाले आहेत त्यावर यथायोग्य प्रकाश टाकला होता. अव्यवहारी नांदापूरकरांना सारेच संशोधक स्वतःसारखे प्रामाणिक वाटले हेच चुकले. त्यांना वाटले, निदान या लेखानंतर तरी पुढच्या खंडांच्यासाठी वसुमतीप्रत कटाक्षाने अभ्यासली जाऊन प्रमाणित पाठ निर्देशिले जातील, पण संशोधनाच्या क्षेत्रातील निगरगट्टपणा वंदनीय आहे. त्यानंतर प्रियोळकर यांनी चिकित्सक आवृत्तीचे अजून दोन खंड पूर्ववत वसुमती प्रतीचा आधार न घेता छापले. प्रस्तुत लेखाचा लेखक डॉ. नांदापूरकरांच्या निकट सहवासात असल्यामूळे या घटनेचा त्यांना झालेला वैताग लेखकाला ज्ञात आहे. माझ्या दुर्दैवाने प्रियोळकरांची चिकित्सक आवृत्ती एम.ए.च्या विद्यार्थ्यांना मला शिकवावी लागली. संपादक महाशयांचे महाभारताचे ज्ञान जसे असमाधानकारक आहे तसे समग्र मूक्तेश्वरांच्या कविप्रकृतीचे ग्रहणही बेताचेच आहे. त्यामुळे प्रियोळकरी आवृत्ती प्रकाशित झाल्यानंतरही मुक्तेश्वरी प्रमाणप्रतीची आवश्यकता याबाबतचे नांदापूरकरांचे लेखन