पान:अभिवादन (Abhivadan).pdf/18

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुक्त-मयूरांची भारते । १७

करतात, याचे कारण त्यांची महाभारताकडे पाहण्याची भूमिकांच भक्तिप्रधान आहे. जगाच्या उद्धारासाठी भारत मराठीत आणणे काय आणि आत्मोद्धारासाठी भारत मराठीत आणणे काय या दोन भूमिकांतील फरक मोरोपंत अधिक विनयशील होते इतकेच दाखवतो. दोघेही महाभारताकडे पवित्र धार्मिक ग्रंथ म्हणून पाहतात. दोघांनाही पांडवांचा पक्ष हा कृष्णाचा पक्ष-सत्पक्ष आहे, भक्तांचा पक्ष आहे हे मान्य आहे; आणि महाभारताकडे पाहण्याची ही भूमिका दोघांनीही त्या काळच्या प्रचलित समजुतींतून घेतली आहे. त्या काळचे सर्वच जण भारताकडे धार्मिक ग्रंथ म्हणून पाहत. मुक्त-मयूर यांनीही त्याच दृष्टीने पाहिले आहे. मुक्तेश्वर आणि मोरोपंत महाभारताकडे ज्या श्रद्धेच्या व भक्तीच्या डोळ्यांनी पाहत होते त्याच दृष्टिकोणातून व्यासांनी कौरव-पांडवांचा इतिहास लिहिला आहे, अशी मुक्त-मयूरांची धारणा होती. मुक्तेश्वर आणि मोरोपंत यांच्या भूमिका तर एक आहेतच, पण व्यासांच्यापेक्षा त्यांची भूमिका भिन्न आहे हे जे आपण म्हणतो ते मुक्तेश्वरांना ज्ञात नव्हते. व्यासापेक्षा उभय मराठी कवींत निर्माण झालेली भिन्नता भारत समजून घेण्याच्या पद्धतीत आहे. कौरव-पांडवांच्या कथानकाकडे पाहण्याची व्यासांची भूमिका इतिहासकाराची आहे असे वाटते, तर आमच्या कवींनी आपली भारते लिहिलीच नसती. ग्रहणक्षमतेच्या अपुरेपणातून निर्माण झालेला हा फरक नांदापूरकरांनी कवींच्या स्वातंत्र्याचा पुरावा म्हणून गृहीत धरला आहे, हे पटणे जरा कठीणच आहे.
 आज ज्या अवस्थेत महाभारत आहे, त्या अवस्थेत ते व्यासांनी लिहिलेले नाही हे अगदी उघड आहे. आजच्या महाभारतातील यात्रावर्णने, तीर्थवर्णने आणि तात्त्विक संवाद हे तर फारच उत्तरकालीन आहेत. उपाख्यानांपैकी काही उपाख्याने. वीरगाथा असून त्या मूळ भारतात बसवून दिल्या आहेत, तर उरलेल्या कथा नारायणीय धर्माच्या उदयानंतरच्या आणि सूतांचे वाङमय ब्राह्मणांनी आत्मसात केल्यानंतरच्या अशा आहेत. उत्तरकालीन बुद्ध वाङमयात पांडव हे जातिवाचकनाम म्हणून आलेले असल्यामुळे मूळ महाभारतात कौरव-पांडव हे एकाच कुलातील होते, असे तरी सांगितले असेल काय हेसुद्धा नक्की सांगता येत नाही. त्यामुळे आहे या परिस्थितीत आजच्या महाभारताचा ग्रंथोद्देश सांगणे थोडेसे कठीण आहे. कौरवपांडवांचे हे घरगुती भांडण अखिल भारतीय युद्धात कसे रूपांतरित झाले, हेसुद्धा ज्या ग्रंथात नक्की सांगितलेले नाही त्या ग्रंथाची भूमिका, इतिहास सांगणे ही होती हे मान्य करणे कठीण आहे. प्राचीन ऐतिहासिक कथानके महाभारतात आहेत. या कथानकांचा अभ्यास करून शतानिक पूर्वकालीन काही ऐतिहासिक घटना नक्की करता येतीलही; पण यावरून प्राचीन भारतेतिहासाच्या राजकीय व सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने महाभारत हा मोलाचा ग्रंथ आहे, इतकेच सिद्ध होईल. ग्रंथलेखनाची भूमिका पुराणपद्धतीने इतिहास काव्यमय करून सांगणे ही होती असे