पान:अभिवादन (Abhivadan).pdf/20

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुक्त-मयूरांची भारते । १९

वाद ठरलेले नाही. मुक्तेश्वरी महाभारताला मूळ महाभारताचा ठिकठिकाणी आधार आहे. हा आधार लक्षात न घेता पाठचिकित्सा केली म्हणजे ' उपरीचरवसु' अपपाठ म्हणून घेण्याची बुद्धी होते. मुक्तेश्वराच्या बाबतीत अजून एक विचित्र गोष्ट घडलेली आढळून येते आणि ती म्हणजे श्रीधराचा त्यांच्यावर झालेला परिणाम. वस्तुतः श्रीधर हा कवी मुक्तेश्वरांचा उत्तरकालीन, पण मुक्तेश्वरांचा श्रीधरावर अतोनात परिणाम असल्यामुळे श्रीधरोत्तरकालीन मुक्तेश्वरांच्या प्रतलेखकांनी श्रीधरावरून मुक्तेश्वर दुरुस्त करण्याचा यत्न केला आहे. यामुळे अनेकविध ठिकाणी श्रीधराचा मुक्तेश्वरांवर झालेला परिणाम तपासून घ्यावा लागतो, तसा प्रियोळकरांनी घेतलेला नाही. श्रीधराचा मुक्तेश्वरांवर झालेला परिणाम सर्वप्रथम नांदापूरकरांनी उजेडात आणला. मुक्तेश्वरांचा आणि इतर मराठी संतकवींचा त्यांनी किती वारकाईने अभ्यास केला असावा याची ही एक साक्ष आहे.
 मुक्तेश्वरांची ५ पर्वे उपलब्ध असल्यामुळे त्यांनी महाभारताची किती पर्वे लिहिली असावीत हाही वादग्रस्त प्रश्न होता. ज्या अर्थी 'सौप्तिक'पर्व मुक्तेश्वरांनी लिहिले आहे त्या अर्थी 'उद्योग', 'भीष्म', 'द्रोण', 'कर्ण', 'शल्य' आणि 'गदा' ही सहा पर्वेही त्यांनी लिहिली असावीत व ती अजून अनुपलब्ध असली तरी अस्तित्वात असावीत ही याबाबतची एक भूमिका. जर विराट आणि सौप्तिक यांतील सहा पर्वे गहाळ असतील तर पुढची पाच पर्वे गहाळ नसतील कशावरून ? मुक्तेश्वरांचे हरिश्चंद्राख्यान ज्या अर्थी काही प्रतीत शांतिपर्वांतर्गत गृहीत धरले आहे, त्या अर्थी शांतिपर्वापर्यंत मुक्तेश्वर पोचले होते व असे जर असेल तर शेवटचीच तीन पर्वे अमान्य का करावीत ? एतावता मुक्तेश्वरांनी संपूर्ण महाभारत मराठीत आणले असावे ही या वादाची दुसरी भूमिका झाली. आणि उपलब्ध ५ पर्वेच त्यांनी लिहिली असावीत ही तिसरी भूमिका. नांदापूरकरांनी याही ठिकाणी आपली चिकित्सक मर्मग्राही बुद्धी वापरली आहे. आजच्या उपलब्ध छापील प्रबंधात त्यांनी सौप्तिकपर्व मुक्तेश्वरांनी सर्वप्रथम रचले असावे हे सिद्ध करणारा पुरावा सादर केला आहे. स्त्रीपर्वाचा आढावा घेऊन 'ओविका कवींच्या' या ईश्वराची सौप्तिकपर्वात प्राथमिक अवस्था कशी आहे हे त्यांनी दाखविले आहे. या पर्वात भाषांतरित भाग सर्वांत अधिक आहे. सामान्यत: मुक्तेश्वर तत्त्वचर्चाचा विस्तार करतात, पण या पर्वात तिथेही भाषांतर आहे. संस्कृत भाषेवर पूर्ण पकड नाही, आणि मराठी भाषेवर तितके प्रभुत्व नाही. मुक्तेश्वर दर पर्वाच्या आरंभी जसे मागील पर्वाशी अनसंधान जोडून घेतो तसे इथे नाही. त्यामुळे उपलब्ध पाच पर्वांत सौप्तिकाची र सर्वप्रथम झाली हे सिद्ध आहे. छापील प्रतीत नसलेला पण मी मूळ हस्तलिखित प्रतीत वाचलेला भाग यापेक्षा विस्तृत होता. नांदापूरकरांनी विराटपर्वात मुक्तेश्वरांची प्रतिभा कशी मंदावली होती याचाही विस्तृत आढावा घेतला होता. हा