पान:अभिवादन (Abhivadan).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


९८ । अभिवादन



सिद्धांताने तीस-चाळीस वर्षे मराठी वाङमयसमीक्षेला विनोदचर्चेसाठी आधार दिला आहे, हे नाकारता येत नाही. बीजग्रंथकारांचे वैशिष्टयच हे असते. त्यांचे सिद्धांत निर्विवादपणे पुढे मान्य होतील असे नाही, पण त्या सिद्धांतांच्या खंडन-मंडनात समीक्षकांच्या पिढ्या उत्साहाने गुंतून पडतात आणि त्या क्षेत्रातील गुंतागुंतीच्या समस्यांच्यावर नवा प्रकाश पडून त्यात ज्ञानक्षेत्राचा विकास होतो. मराठी वाङ्मयसमीक्षेत दीर्घ काळपर्यंत केळकरांचे विचार हा समीक्षेसाठी एक महत्त्वाचा आधार राहिला. कोल्हटकरांना हा भाग्ययोग कधी आला नाही. कोल्हटकरांचा . कोणताही सिद्धांत पुढच्या वाङमयसमीक्षकांना आपल्या विवेचनाचा केंद्रबिंदू करावासा वाटला नाही. माडखोलकरांनाही केळकरांचे हे मोठेपण नाकारण्याची इच्छा नाही. स्वत: माडखोलकरच, त्यांच्या प्रकृतिधर्माप्रमाणे पाहिले, तर केळकरांचे अधिक वारसदार आहेत. त्या प्रमाणात त्यांच्या वाङमयात कोल्हटकरांचा वारसा सांगता येणे कठीण आहे.
 श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा काही मोठेपणा कुणीच नाकारीत नाही. ज्या तीन लेखकांनी प्रौढ मराठी समीक्षेचा पाया घातला, त्यांत केळकर, वामन मल्हार आणि कोल्हटकर ही त्रयी आहे. प्रत्यक्ष मराठी वाङमयविवेचन पाहिले, तर वाङमयाच्या आकलन, आस्वाद व मूल्यमापनात कोल्हटकरांनी निर्माण केलेली चौकट ही एका युगाची चौकट होती, हेही सर्वजण मान्य करतात. कोल्हटकरांनी आखून दिलेल्या चौकटीतच थोडा फार फरक करून मराठी समीक्षा मर्डेकरांच्या उदयापर्यंत वावरत राहिली. या क्षेत्रातील सिद्धान्तचर्चा सोडल्यास उरलेल्या विवेचनावर सर्वांत मोठा प्रभाव कोल्हटकरांचाच होता. ते युगप्रवर्तक नाटककार होते. विनोदपीठाचे आचार्य होते. गडकरी, वरेरकर, अत्रे, खांडेकर, माडखोलकर, गुर्जर, खानोलकर अशा एका फार मोठ्या अनुयायी वर्गाने, आपण त्यांचे शिष्य आहोत, असे सांगण्यात जन्मभर अभिमान बाळगला. हे भाग्य इतर कुणाच्याही वाटयाला आले नाही. कोल्हटकरांचा हा मोठेपणा कधीच कुणी नाकारीत नाही. पण हा मोठेपणा मान्य केला, तरी त्यामुळे त्यांच्यातील उणिवा झाकल्या जाऊ शकत नाहीत. या उणिवांना समर्थने देण्यात अर्थ नसतो.
 पहिली गोष्ट अशी की, क्रमाने कोल्हटकर मागे पडले. इ. स. १८७१ ला त्यांचा जन्म झाला. १८९३ पासून ते लेखक म्हणून उदयाला येऊ लागले. इ. स. १८९६ ला त्यांचा वैभवकाळ सुरू होतो. १९११ पासून ते मागे पडू लागतात. म्हणजे कोल्हटकर वयाच्या बेचाळीसाव्या वर्षापासून मागे पडू लागले. आयुष्याची शेवटची वीस वर्षे क्रमाने ते अधिकाधिक मागेच पडत गेले. हे कोल्हटकरांचे मागे पडणे माडखोलकरांना मान्य आहे. फक्त या मागे पडण्याला ते अधिक चांगली कारणे शोधू इच्छितात. माडखोलकरांची कारणे खरीही जरी मानली, तरी हा