पान:अभिवादन (Abhivadan).pdf/100

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


श्री. ग. त्र्यं. माडखोलकर । ९७


पत्रकारांत ते सर्वांत चौरस आणि सौजन्यशील पत्रकार होते, असेही त्यांना वाटते, पण ते फार मोठे इतिहासकार नव्हते, तत्त्वचिंतनाचा त्यांच्याजवळ अभाव होता, त्यांच्या लिखाणात शैलींचे सौष्ठव, विविधता, बहुश्रुतपणा, कोटिक्रम भरपूर होता, पण खोली नव्हती. नाटककार या नात्याने खाडिलकरांशी व समीक्षक या नात्याने कोल्हटकरांशी त्यांची तुलना होऊ शकत नाही. माडखोलकरांनी स्पष्टपणे म्हटले नाही, पण त्यांना ते श्रेष्ठ शैलीकार व दुय्यम दर्जाचे लेखक वाटतात, हे स्पष्ट आहे.
 पैकी केळकरांना साहित्यसम्राट म्हणावे काय, हा अगदी गौण मुद्दा आहे. अशा पदव्या लोक प्रेमगौरवाच्या पोटी देतात. त्या काटेकोरपणे पाहायच्या नसतात. केळकरांना साहित्यसम्राट म्हणणे आणि कोल्हटकरांना साहित्यसिंह म्हणणे या गोष्टी टिळकांना लोकमान्य म्हणण्यासारख्या नाहीत. टिळक हे सर्वार्थाने लोकमान्य होते. पण अणे यांना ज्या वेळी आपण लोकनायक म्हणतो, त्या वेळी तो गौरवबुद्धीचा भाग आहे. या गौरवाच्या बाबी सोडून दिल्या, तर काही मुद्दे शिल्लक राहतात. केळकर हे खाडिलकर-गडकऱ्यांच्या बरोबरीचे नाटककार आहेत, असे कुणीच म्हणणार नाही. पण वाङमयेतिहासाचे प्रश्न बाजूला ठेवून, केवळ नाट्यगुण आपण तपासू लागलो, तर केळकरांचे 'तोतयाचे बंड' आणि 'कृष्णार्जुनयुद्ध' यांच्या तुलनेत कोल्हटकरांचे एकही नाटक बसणार नाही. कोल्हटकर युगप्रवर्तक नाटककार असतील, पण त्यांच्यातील नाट्यगुण केळकरांच्यापेक्षाही कमी होते.
 साहित्यसम्राट केळकर यांच्या वाङ्मयसमीक्षेला खोली आहे की नाही, हा विवाद्य मुद्दा आहे. पण केळकरांच्या नावाशी वाङ्मयसमीक्षेतील दोन कल्पना कायमच्या जोडलेल्या आहेत. एक म्हणजे केळकरांचा सविकल्प समाधीचा सिद्धांत. तो त्यांनी वडोदे संमेलनात मांडला आणि त्यावर पुढे पंचवीस वर्षे मराठी समीक्षा चर्चा करीत राहिली. आजही केळकरांचा सविकल्प समाधीचा सिद्धांत चर्चा करण्याजोगा आहे. तो पुनःपुन्हा खोडून काढण्याचा उत्साह टीकाकारांना वाटतो. कुठे तरी मनात ही जाणीव शिल्लक राहते की, या सिद्धांताचे आपण संपूर्ण खंडन करू शकत नाही. त्या सिद्धांतातील दोष आणि उणिवा दाखवून आपल्याला थांबावे लागते. वाङमयात व्यक्ती असतात आणि आपण त्यांच्याशी तादात्म्य पावतो, या केळकरांच्या म्हणण्यात फार मोठे सत्य आहे. ते सत्य नाकारता येत नाही. लोल्लटाचा सिद्धांत ज्याप्रमाणे पुनःपुन्हा भुतासारखा उभा राहतो, तसे केळकरांच्या या सिद्धांताचे आहे. मी स्वतः हा सिद्धांत नाकारणारा आहे. पण त्यामुळे या सिद्धांताचे महत्त्व कमी होत नाही.
 केळकरांशी चिकटलेला दुसरा सिद्धांत विनोदाविषयीचा, म्हणजे औचित्यविसंगती हा विनोदाचा गाभा आहे, हा होय. हा सिद्धांत तर मराठीत आजही प्रमाण झाल्यासारखा झाला आहे. मला स्वतःला हाही सिद्धांत पटत नाही, पण या