पान:अभिवादन (Abhivadan).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


९६ । अभिवादन



आहे. खाडिलकर हे जेव्हा 'भाऊबंदकी', 'कीचकवध' सोडून 'मानापमाना'कडे वळतात, त्या वेळेला नुसता गद्य नाटके व संगीत इतकाच बदल घडत नाही. त्यांच्या नाटकाच्या एकूण प्रकृतीवरच त्याचा परिणाम होतो. 'मानापमाना'मध्ये नुसती संगीताची लयलूट आहे इतकेच नाही, तर गंभीर नाटय आणि संघर्ष यालाही पारखे असणारे ते नाटक आहे. या नंतरच्या खाडिलकरांच्या नाटकात तुल्यबळ प्रतिस्पर्धी क्वचितच एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. 'विद्याहरणा'तील शुक्राचार्यांच्या समोर किंवा 'स्वयंवरा'तील श्रीकृष्णासमोर संघर्ष करण्यासाठी या नाटकांच्यामधून तेवढी बलशाली व्यक्तित्वेच नाहीत. क्रमाने खाडिलकरांच्या नाटकांत मोहक आणि स्वप्नाळू प्रणय महत्त्वाचे स्थान मिळवू लागतो. या नाटकांचे सामर्थ्य संगीतातील स्वप्नविलास, प्रणयातील स्वप्नरंजन या दिशेने जाऊ लागते. जाणीवपूर्वक खाडिलकरांनी हे केले नसेल, पण हा बदल त्यांच्या नाटकात दिसू लागतो, हे खरे आहे. फक्त हळूच माडखोलकरांनी, भारतीय परंपरा व 'सौभद्र' यांचा खाडिलकरांनी आपल्या नाटकांशी सांधा जुळवला हे सांगताना, 'मूकनायका'चे पिल्लू सोडून दिलेले आहे. पण खाडिलकरांच्या नाट्यातील परिवर्तने लक्षात घेताना 'मूकनायक' विचारात घेण्याची गरज नसावी.
 खाडिलकर वगळता केळकर आणि कोल्हटकर हे तर माडखोलकरांचे प्रत्यक्ष गुरू. पुष्कळदा केळकर त्यांना कोल्हटकरांचे शिष्य म्हणत आणि कोल्हटकर त्यांना केळकरांचे शिष्य म्हणत. उतारवयात माडखोलकरांच्याजवळ जी आदरबुद्धी कोल्हटकरांच्याविषयी उरलेली आहे, ती केळकरांच्याविषयी उरली नाही. दोघांच्याहीविषयी त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने आणि निर्भयपणे पुष्कळ बाबी सांगितल्या आहेत; पण कोल्हटकरांच्याविषयी लिहिताना ते कोल्हटकरांचे समर्थन करीत असताना दिसतात. केळकरांच्याविषयी अशा समर्थनाची त्यांना गरज भासत नाही. केळकर हे साहित्यसम्राट म्हणून अनेकांनी गौरविलेले. अनेक संस्थांचे चालक म्हणन सतत प्रकाशझोतात मिरवणारे. ते राजकारणात पराभूत झाले, तरी त्यांच्याभोवती प्रतिष्ठेचे एक मोठे वलय शेवटपर्यंत शिल्लक होते. महाराष्ट्राच्या संस्थात्मक जीवनात साहित्यसम्राट यांचा वाटा सिंहाचा होता. त्यांच्या भोवताली नेहमीच माणसांची गर्दी होती. कोल्हटकरांच्याप्रमाणे केळकर कधी विजनवासात गेले नाहीत. यामुळे केळकरांच्याविषयी कोणतीही दयामाया दाखविण्याची गरज नाही, अधिक निर्भय. पणे व निर्भीडपणे बोलले तरी चालेल, असे माडखोलकरांना वाटते. केळकरांचे गांधींच्या राजकारणाविषयीचे विचार बरोबर होते, असे आजही त्यांचे मत आहे. पण त्यांना साहित्यसम्राट समजावे काय, याविषयी त्यांना शंका वाटते.
 केळकर हे मराठीतील फार मोठे शैलीकार होते, ही गोष्ट खरीच आहे. ती माडखोलकरांनाही मान्य आहे. ते फार मोठे पत्रकार आणि संपादक होते, समकालीन